

बाणेर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : बाणेर येथील बाणेर-औंध लिंक रोड (मेडिपॉइंट चौक ते बाणेर ज्युपिटर हॉस्पिटल चौक ) व मुळा नदीच्या निळ्या पूररेषेतील पत्राशेड व अनधिकृत बांधकामांवर पुन्हा कारवाई करण्यात आली. बांधकाम विकास विभाग झोन 3 व औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय अतिक्रमण विभाग यांच्यामार्फत पोलिसांच्या मदतीने ही संयुक्त कारवाई करण्यात आली. या कारवाईत जवळपास
67 हजार चौ. फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले.
या ठिकाणी दहा दिवस आधीच कारवाई करण्यात आली होती. तथापि, नागरिकांनी पुन्हा निळ्या पूररेषेतील यापूर्वी पाडलेली बांधकामे पुन्हा उभी केल्याचे तसेच व नव्याने बांधकामे केल्याचे निदर्शनास आल्याने या ठिकाणी पुन्हा कारवाई करण्यात आली असल्याचे महापालिका अधिकार्यांकडून सांगण्यात आले.
या कारवाई प्रसंगी सहायक आयुक्त संदीप खलाटे, उप अभियंता निवृत्ती उतळे, कनिष्ठ अभियंता संदेश कुवळमोडे, अजित सणस, विश्वनाथ बोटे, डी. एन. जगताप, नवीन महेत्रे, सूरज शिंदे, प्राची सर्वगोड, दोन अतिक्रमण निरक्षक व स्टाफ, पोलिस अधिकारी राजू अडागळे, राजकुमार केंद्रे व स्टाफ यांच्या पथकाने पाच जेसीबी, दोन गॅस कटर, एक ब—ेकर, एक अग्निशमन व्हॅन, एक क्रेन, 10 अतिक्रमण कर्मचारी यांच्या साहाय्याने कारवाई केली.
ही कारवाई होत असताना, कारवाई झालेल्या जागामालकांमध्ये प्रचंड रोष दिसून येत होता. बांधकाम व्यवसायिकाला जागेचा ताबा मिळवून देण्यासाठी आमच्यावर वारंवार कारवाई केली जात असल्याचे येथील जागामालकांनी याप्रसंगी सांगितले. अतिक्रमण विभाग ही कारवाई बांधकाम व्यावसायिकांच्या दबावाखाली करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी कारवाईत पाडलेल्या पत्राशेड आता परत पाडण्याचे काम केले आहे. एवढी तत्परता दाखवत वारंवार जी कारवाई केली जात आहे ती नेमकी कोणासाठी? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे.