कोथरूड; पुढारी वृत्तसेवा : बसची प्रतीक्षा करण्यासाठी बस थांबे विकसित करण्यात आले, परंतु मागील महिनाभरापासून या थांब्यांलगत मोठ्या प्रमाणात रिक्षा पार्किंग होत असल्यामुळे बस बसस्थानकाजवळ न थांबता मुख्य रस्त्यावर उभी राहत असल्याने प्रवाशी वर्गाची धावपळ होत असल्याचे चित्र कर्वेनगर भागात पाहावयास मिळत आहे. यामुळे बसस्थानक अडचण नसून, खोळंबा ठरत आहे व प्रशासन यावर कोणतीच उपाययोजना करत नसल्याने प्रवासीवर्गाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
कोथरूडकडून वारजे माळवाडी भागाकडे जाणार्या मार्गावर कर्वेनगर मुख्य चौक असून, येथे शाळा, महाविद्यालय, दुकाने, मॉल, सोसायटी, वस्तीचा भाग असल्याने नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. नागरिक बसने प्रवास अधिक करत असल्याने उड्डाणपुलाखाली बसथांबे विकसित करण्यात आले आहेत. यामुळे या थांब्यांवर शेडमध्ये उभे राहत प्रवासी बसची वाट पाहात असतात.
बसथांब्याजवळ सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत साधारण 15 ते 20 रिक्षा उभ्या असतात. काही रिक्षाचालक कर्वेनगर ते कोथरूड असा वडाप व्यवसाय करत असतात. मोटार वाहन कायद्यातील नियमांना केराची टोपली दाखवत अधिक प्रवासी बसवत वाहतूक करत असतात. तीन आसन क्षमता असताना 5 किंवा 6 प्रवासी बसवत जिवावर उदार होत वाहतूक करत असल्याचे चित्र सर्रास पाहायला मिळते.
बसथांब्यावरील शेडलगतच रिक्षांचा विळखा असल्याने पर्यायाने बस मुख्य रस्त्याच्या मधोमध थांबत असते. थांब्यापासून बसपर्यंत प्रवाशांना धावत जावे लागते, असे युवकांनी सांगितले, तर वयोमानामुळे बसपर्यंत उशीर होत असतो यामुळे अनेकदा बस निघून जाते व पुन्हा थांब्यावर शेडमध्ये येऊन बसावे लागते, असे ज्येष्ठ नागरिकांनी दैनिक 'पुढारी'शी बोलताना सांगितले.
बस ही थांब्याजवळच उभी राहणे अपेक्षित आहे, जेणेकरून बसमध्ये चढणे व उतरणे सोयीस्कर होईल. याबाबत प्रशासनाने कडक कारवाई करत उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवासीवर्गाने केली आहे. याबाबत वारजे वाहतूक पोलिस विभागाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
यांना आशीर्वाद कोणाचा ?
वाहतूक सुरळीत राहावी व वाहतुकीच्या नियमांचे पालन होते आहे की नाही यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. रिक्षाचालकांना थोडी पुढे रिक्षा लावा, असे सांगितल्यावर काही जण अंगावर धावून येतात. अनेकदा पोलिस विभागाला तोंडी कळवूनदेखील कारवाई होत नाही. यामुळे बस थांब्यालगत असलेल्या पार्किंगच्या विळख्याला प्रशासनाचाच वरदहस्त असावा, अशी चर्चा परिसरात आहे.
बसथांब्याजवळ 1990 पासून रिक्षा स्टँड आहे. नियमानुसार थांब्यापासून ठराविक अंतरावर वाहन पार्किंग करणे आवश्यक आहे. परिसरातील स्थानिक रिक्षाचालक येथे योग्यरितीने पार्किंग करत असतात. बाहेरून आलेल्या नवीन रिक्षाचालकांना स्टँड माहीत नसल्याने ते बेशिस्तपणे पार्किंग करत असतील. सार्वजनिक वाहतुकीला अडथळा होणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. शेअरिंग रिक्षा म्हणजे मोटार वाहन कायदा मोडून रिक्षा चालवणे चुकीचे आहे. लवकरच सर्वांना समजावून सांगण्यात येईल व त्यात बदल दिसेल.
आनंद तांबे, संस्थापक, प्रियदर्शनी रिक्षा संघटनाबसथांबा आम्हाला बसची वाट पाहण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच प्रवासी संख्या जास्त असल्याने बसथांबा देखील अधिक मोठा होणे आवश्यक आहे. प्रामुख्याने थांब्याभोवती होत असलेल्या पार्किंगमुळे बस रस्त्याच्या मध्येच थांबते, त्यामुळे बसमध्ये जाण्यासाठी धावपळ करावी लागते. ही समस्या सुटणे आवश्यक आहे.
राहुल ठोंबरे, प्रवासीया भागात शाळा, महाविद्यालय असल्याने स्थानकावर प्रवासी संख्या मोठी असते. स्थानकाला लागलेले पार्किंगचे ग्रहण ही समस्या जटील होत चालली आहे, यामुळे बसची वाट पहात कोठे थांबावे, असा प्रश्न आहे.
सागर जाधव, प्रवासी