

पारगाव : पुढारी वृत्तसेवा : पारगाव (ता. आंबेगाव) येथून गेलेल्या अष्टविनायक महामार्गावर वाहनांचा वेग वाढल्याने लहान-मोठे अपघात वाढू लागले आहेत. परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावलेल्या संरक्षक कठड्यांना वाहने धडकून कठड्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे महामार्गावर सुरक्षाविषयक उपाययोजना करून अपघात रोखण्याची मागणी परिसरातील नागरिकांसह वाहनचालकांकडून करण्यात आली आहे. नारायणगाव ते शिरूर हा अष्टविनायक महामार्ग तालुक्याच्या पूर्व भागातील कारफाटा (रांजणी), नागापूर, पारगाव या परिसरातून गेला आहे. या परिसरात रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले असले, तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या मार्गावर गतिरोधक टाकलेले नाहीत. त्यामुळे अपघातात वाढ होत आहे.
नागापूर गावच्या हद्दीत थापलिंग देवस्थानाजवळ मानमोडी ओढ्याच्या वळणावर काही दिवसांपूर्वी एका मोटारीवरील चालकाचा ताबा सुटून मोटार संरक्षक कठड्यावर आदळली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परंतु, कठड्याचे मात्र मोठे नुकसान झाले.
मानमोडी ओढा, बढेकर मळा येथे गतिरोधक उभारा
अष्टविनायक महामार्गावर अद्यापही बर्याच ठिकाणी गतिरोधक टाकलेले नाहीत. मानमोडी ओढा, बढेकर मळा येथील वळण धोकादायक आहे. येथे गतिरोधक नसल्याने वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे तेथे त्वरित गतिरोधक बसवावेत, तसेच रस्त्यावरील अपूर्ण कामे हाती घेऊन ती तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी बढेकर वस्तीतील नागरिकांनी केली आहे