सासवड(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सासवड (ता. पुरंदर) येथे फायबर ऑप्टिकल केबल टाकण्यासाठी मुख्य बाजारपेठेत खोदकाम सुरू करण्यात आले. मात्र, सहा महिने झाले तरीही हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. दरम्यान, ठेकेदाराने केबल टाकण्यासाठी रस्ते खोदकाम करून अर्धवट ठेवल्याने याठिकाणी रोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. याबाबत नगरपरिषदेला राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष अॅड. अनुराग टिळेकर यांनी निवेदन दिले.
सासवड शहरात फायबर ऑप्टिकल केबल टाकण्यासाठी ठेकेदाराने या चार किलोमीटरची परवानगी घेतली आहे. यासह शिवतीर्थ चौक, जय प्रकाश चौक व इतर भागांत खोदकाम करण्यात आले आहे. याठिकाणी मुख्य बाजारपेठ असल्याने येथे अपघात होत आहेत. येथे नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. परिणामी, नागरिकांची गैरसोय होत आहे. याकडे ठेकेदार व नगरपालिकेचे लक्ष नसल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहे कंपनीने केलेल्या खोदाई कामाची तातडीने दुरुस्ती व्हावी, अशी मागणी बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील धिवार, भाजप शहराध्यक्ष साकेत जगताप, भाजप शहर उपाध्यक्ष अमोल जगताप यांनीदेखील केली आहे.
सासवड शहरात फायबर ऑप्टिकल केबल टाकण्यास ऑक्टोबर 2022 मध्ये सुरुवात झाली. यासंदर्भात ठेकेदारांना सूचना केल्या आहेत. हे काम दोन दिवसांत पूर्ण केले जाईल.
– निखिल मोरे, मुख्याधिकारी, सासवड नगरपरिषद.