

Pune Accident News: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदारांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पुणे - सातारा महामार्गावरील शिवरे येथे अपघात प्रवणक्षेत्र निर्माण झाल्याने वाहतुकीसह अपघात वाढत आहे. शनिवारी सकाळी झालेल्या विचित्र अपघातात चारचाकी वाहनाचा चेंदामेंदा झाला असून मोटारमधील सात जण जखमी झाले आहेत. सर्वजण मुळशी तालुक्यातील असून नसरापूर येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. जखमींत दोन लहान मुलींचा समावेश आहे.
कालिदास बाळू मांडेकर वय ३३, प्रतिक्षा कालिदास मांडेकर वय २८, रा. राज्ञी कालिदास मांडेकर वय ५, बाळा कालिदास मांडेकर वय ६ महिने, संगीता बाळू मांडेकर वय ५५ शैला भोते वय ५० सर्व रा. चांदे ता. मुळशी, सुदाम दौंडकर वय ३५ रा. नेरे ( ता. मुळशी ) अशी जखमीचे नाव असून ही घटना शिवरे ( ता. भोर ) येथे पुणे - सातारा महामार्गावर शनिवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पुणे बाजूला घडली आहे. या अपघातात एक महिला गंभीर असून इतर सर्व जखमी सुरक्षित असल्याचे सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ. राजेंद्र डिंबळे यांनी माहिती दिली.
अधिक माहिती अशी कि, मांडेकर कुटुंब व इतर नातेवाईक क्र. एम .एच. १२ यू.एस. १७१७ फॉर्च्यूनर या कारमधून मांढरदेवी काळूबाई येथे देवदर्शनासाठी आले होते. परत जात असताना शिवरे ( ता. भोर ) येथील महामार्गावरील खड्डे चुकवत असताना कार दुभाजकाच्या बाजूला टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्याला धडकून जोरदार अपघात झाला.
या ठिकाणी उड्डाणपुलाच्या कामामुळे येथील वाहतूक वळणाजवळ मधल्या दुभाजकाला लागून मातीचा ढिगारा टाकण्यात आला आहे. त्याला धडकून कार अक्षरशः हवेत उडून उलटली. या गाडीत एकूण सात जण होते. त्यातील एक जण गंभीर जखमी इतर किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेच्यावेळी शेजारील पेट्रोल पंपातील कामगार व स्थानिकांनी चारचाकी मधील प्रवाशांना बाहेर उपचारासाठी सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र सवयीप्रमाणे वाहतूक पोलीस उशिरा पोहचले.
महामार्ग प्राधिकरणसह निखिल कन्स्ट्रक्शन जबाबदार
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यांचे उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या निखिल कन्स्ट्रक्शन ठेकेदारावर अंकुश नसल्याचे चर्चा होत आहे. अपघातात ठिकाणी ठेकेदाराने रिफ्लेक्टर, दिवे, फलक लावणे आवश्यक होते. मात्र अशी कोणतीही खबरदारी येथे घेण्यात आलेली नाही. याठिकाणी अपघात प्रवणक्षेत्र निर्माण झाल्याने मागील महिन्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता. आजच्या घटनेत देखील महामार्ग प्राधिकरणसह निखिल कन्स्ट्रक्शन जबाबदार असल्याचे आरोप होत आहे.