Accident News | खंडाळा घाटात भीषण अपघात : दोघांचा मृत्यू

Accident News | खंडाळा घाटात भीषण अपघात : दोघांचा मृत्यू

Published on

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा : खंडाळा बोर घाटात जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बॅटरी हिलजवळ एक कंटेनर आणि स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमध्ये बसलेल्या दोघांचा मृत्यू झाला. सोमवारी (दि. 20) रात्री दहाच्या सुमारास मुंबईच्या दिशेने भरधाव जाणारा कंटेनर पुण्याच्या दिशेने येणार्‍या कारवर उलटून अपघात झाला. लोणावळ्याकडून जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने मुंबई मार्गावर वाघजाई मंदिराच्या पुढे बॅटरी हिल परिसरात तीव्र उतार आणि वळण आहे.

या ठिकाणी सोमवारी रात्री दहाच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर क्र. (एमएच 14 एफ.टी. 1445) हा समोरून येणार्‍या कारवर (एमएच 14 बीएक्स 1605) उलटून पडला. प्राथमिक माहितीनुसार, कारमधील व्यक्ती अलिबागवरून तळेगाव, मावळ या दिशेने निघाले होते. या कारमधून तळेगाव येथील रहिवासी चौधरी कुटुंबातील आठ जण प्रवास करीत होते. अपघातात दतात्रय रामदास चौधरी (55) आणि कविता दतात्रय चौधरी (46, दोघेही रा. निमडाळे, धुळे; सध्या रा. देवकण पिंपरी, जळगाव) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, भूमिका दतात्रय चौधरी (16) व मितांश दतात्रय चौधरी (9, दोघेही रा. निमडाळे, धुळे; सध्या रा. देवकण पिंपरी, जळगाव), योगेश श्रीराम चौधरी (40), जान्हवी योगेश चौधरी (31), दीपांशा योगेश चौधरी (9) आणि जिगीशा योगेश चौधरी (वय दीड वर्ष) (चौघेही राहणार संस्कृती बिल्डिग, राव कॉलनी, तळेगाव) हे सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची खबर मिळताच अपघातग्रस्तांच्या मदतीला या बचाव पथकाचे सदस्य, महामार्ग पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले आणि सर्वप्रथम कारमध्ये अडकलेले सर्व जखमी तसेच दोन्ही मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त कार रस्त्यावरून बाजूला केली. अपघातानंतर कंटेनरचालक पळून गेला असून, लोणावळा शहर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक लाड करीत आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news