मागोवा! विठ्ठलराव गाडगीळ; अष्टपैलुत्वाने वाढवली वडिलांची कीर्ती..

मागोवा! विठ्ठलराव गाडगीळ; अष्टपैलुत्वाने वाढवली वडिलांची कीर्ती..

[author title="सुनील माळी" image="http://"][/author]

उभ्या देशातून आलेल्या, विविध प्रांतातल्या पत्रकारांच्या नवी दिल्लीतल्या क्लबच्या दारातून त्यांची पावले आत आली. मात्र, आत गर्दी केलेले नानाभाषक पत्रकार एकदम उठून उभे राहिले, त्यांनी टाळ्यांच्या गजरात त्या व्यक्तीचे स्वागत केले. पत्रकारांच्या क्लबमध्ये अशा स्वागताचा मान मिळणे ही अनोखी घटना घडली होती, पण हा मान मिळवणारी व्यक्ती पुणेकर होती… बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ…

विठ्ठलरावांना काँग्रेस पक्षाने देश पातळीवरचे प्रवक्तेपद दिले होते. आपल्या प्रसन्न, मिश्कील, हजरजबाबी व्यक्तिमत्त्वाने आणि प्रांजळपणाने मत व्यक्त करण्याच्या-माहिती देण्याच्या स्वभावाने त्यांनी पत्रकारांची मने जिंकली होती. पक्ष प्रवक्त्याला काही माहिती वेळेच्या आधी देता येत नाही. काही विषयांबाबत उघडपणे म्हणजेच ऑन रेकॉर्ड बोलता येत नाही. तरीही अनेक विषयांबाबतची पार्श्वभूमी, पूरक माहिती पत्रकारांना हवी असते. अशी माहिती असणारे विठ्ठलराव आपल्या व्यासंगी वृत्तीमुळे पत्रकारांची ती भूक भागवत, त्यांना मार्गदर्शन करत. त्यामुळेच त्यांच्याकडून होणारे पक्षाचे नेहमीचे ब्रिफिंग म्हणजे रोजची पत्रकार परिषद पत्रकार सहसा चुकवत नसत. ते पत्रकारांमध्ये लोकप्रिय झाले होते. काँग्रेसने नंतर काही कारणांनी विठ्ठलरावांकडचे ते काम दुसर्‍या पदाधिकार्‍याकडे सोपवले. काही काळाने परत काँग्रेसने त्यांच्याकडे प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली. त्यांनी पुन्हा प्रेस क्लबमध्ये प्रवेश केला तेव्हा पत्रकारांनी न राहवून त्यांचे उभे राहून स्वागत केले.

'सांगे वडिलांची कीर्ती, तो एक मूर्ख' या रामदासांच्या पंक्तीप्रमाणे केवळ वडिलांच्या पुण्याईवर राजकारणात पदे आणि त्याबरोबर येणारी प्रसिद्धी मिळवायची, या वाटेने जाणारे बहुसंख्य जण राजकारणात गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिसतात, पण केवळ वडिलांच्या संपन्न वारशावर अवलंबून न राहता स्वकर्तृत्वाचा स्वतंत्र ठसा देशाच्या राजकीय अन् समाजजीवनावर उमटवणारे हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच असतात. 'काकासाहेब गाडगीळांचे सुपुत्र' एवढीच आपली ओळख राहू न देणारे बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ त्यापैकीच एक. निष्णात वकील, फर्डे वक्ते, पुण्याचे आदर्श लोकप्रतिनिधी, मुत्सद्दी राजकारणी, कार्यक्षम मंत्री असे कितीतरी पैलू या एकाच व्यक्तिमत्त्वाचे होते.

देशासाठी खस्ता खाणार्‍या, ब्रिटिश काळातील मंत्रिमंडळाप्रमाणेच नेहरूंच्या मंत्रिमंडळातही मोलाची कामगिरी करणार्‍या, पंजाबचे राज्यपाल अन् पुणे विद्यापीठाचे कुलगुरूपदही भूषवणार्‍या काकासाहेब गाडगीळ यांच्याकडून वैचारिकतेचे, राजकारण-समाजकारणाचे बाळकडू विठ्ठलरावांना मिळालेच, पण केवळ त्यावरच विसंबून न राहता त्यांनी स्वत:च्या व्यासंगाने आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले.
विठ्ठलरावांना काँग्रेसने आधी राज्यसभेवर संधी दिली. ते 1971 ते 1980 या काळात राज्यसभेचे सदस्य होते. पक्षाने म्हणजे इंदिरा गांधी यांनी प्रथम त्यांना लोकसभेसाठी संधी दिली ती 1980 मध्ये. तोही एक किस्साच आहे.

आणीबाणीनंतरच्या पराभवाने तोंड पोळलेल्या इंदिरा गांधी या एकएका जागेसाठी विचार करून उमेदवार ठरवत होत्या. त्या वेळी उमेदवारी अर्ज भरायला थोडाच अवधी राहिला असताना विठ्ठलराव यांना इंदिरा काँग्रेसने तिकीट दिले. "तिकीट जाहीर करायला एवढा उशीर का लागला ?", अशी विचारणा नंतर विठ्ठलरावांनी इंदिराबाईंकडे केली. तेव्हा त्या म्हणाल्या, "तुमच्या पुण्यात काकाकुवा मॅन्शन नावाची बिल्डिंग आहे. तिथं रात्री झालेल्या जनता पार्टीच्या मीटिंगमध्ये एन. जी. गोरे यांना आपल्याविरुद्ध उभं करायचं ठरल्याचं मला मध्यरात्री दोनला समजलं. मग मी म्हटलं 'पुने मे एक पंडित सेलडने के लिये हमेभी पंडित देना चाहिये'…," जनता पक्षाने 1977 मध्ये शानदार विजय मिळून इंदिरा गांधी यांच्याकडून सत्ता हिसकावून घेतली होती.

त्याच म्हणजे तेव्हा सत्ताधारी असलेल्या पक्षाकडून ज्येष्ठ समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांना उमेदवारी मिळाल्याची खबर मिळाल्यावर एका ब—ाह्मण समाजाच्या उमेदवाराविरोधात आपणही ब्राह्मण समाजाचा उमेदवार दिला तर आपला विजय निश्चित, एवढा बारीक विचार त्यांनी केला होता. इंदिराबाईंच्या अटकळीप्रमाणे विठ्ठलराव हे नानासाहेबांवर 28 हजार 830 चे मताधिक्य मिळवून विजयी झाले. त्यानंतर विठ्ठलरावांनी 1984 ते 1989 आणि 1989 ते 1991 अशा सलग दोन निवडणुका जिंकून विजयाची हॅटि्ट्रक केली. त्यांनी 1991 ची चौथी निवडणूकही जिंकली असती, पण पक्षातील शरद पवार यांच्या समर्थकांनी गाडगीळ यांना पाडण्यासाठी पक्षविरोधी काम केल्याने पुण्यात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत विजय मिळाला. काँग्रेसचे अनेक आमदार, पदाधिकारी प्रचार करताना हाताचा गोल करून लोकांना यकमळ, कमळ…' असे दाखवत असल्याचे चित्र अजून डोळ्यांपुढे उभे राहाते. पुढे मात्र तेच कमळ आपल्या पक्षाचा पिच्छा 2014 पासूनची अनेक वर्षे सोडणार नाही, हे त्या छुपा प्रचार करणार्‍यांच्या ध्यानीमनीही नव्हते.

विठ्ठलरावांनी राजीव गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री म्हणून काम केले. ते करताना त्यांनी पुण्याकडेही विशेष लक्ष दिले. पुणे आकाशवाणी केंद्रात बदल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीचे जतन करण्याच्या योजनेला त्यांनी गती दिली. मुंबईला दूरदर्शन केंद्र सुरू झाले तेव्हा त्याचे कार्यक्रम पुण्यापर्यंतच दिसत होते. त्यामुळे सिंहगडावर टॉवरची उभारणी त्यांनी केली. परिणामी, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली-सातारा भागांतही दूरदर्शनचे कार्यक्रम दिसू लागले. राज्याकरता दुसरा सह्याद्री चॅनेल विठ्ठलरावांनी 9 ऑगस्ट 1985 ला सुरू केला. लँडलाईन फोन मिळायला पूर्वी पाच वर्षे लागत. विठ्ठलरावांनी त्यात लक्ष घातले.

त्यामुळे फोनची प्रतीक्षा यादी दोन वर्षांत संपली. दूरसंचार विभागाची चार दूरध्वनी एक्स्चेंज त्यांनी पुण्यात आणल्याने फोनची एकदम 25 हजार नवी कनेक्शन मिळाली. एकदम चार एक्सचेंज पुण्याला देण्यात आल्याने तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांनी विनोदाने विठ्ठलरावांना "गाडगीलसाब, आप हमारे लिये कुछ छोडेंगे की नही ?," असे विचारले. संरक्षण विभागाला सुटे भाग पुरवण्याचे काम विठ्ठलरावांनी भारत फोर्जला मिळवून दिले. देहूरोड-कात्रज हा बाह्यवळण मार्ग मंजूर करण्यात विठ्ठलरावांचा मोठा वाटा होता.

पुणे विद्यार्थी गृहाचे अध्यक्ष असलेल्या विठ्ठलरावांनी त्या संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले. काँग्रेसचे नेते आणि देशाचा कारभार करणारा मंत्री ही जबाबदारी पार पाडतानाच विठ्ठलरावांनी सर्वोच्च न्यायालयात काही काळ वकिलीही केली तसेच मुंबईच्या रुपारेल महाविद्यालयात अर्थशास्त्र आणि न्यू लॉ कॉलेजमध्ये घटनात्मक कायदा शिकवलाही. एवढे करून ते थांबले नाहीत, तर कायदेविषयक चार ग्रंथांचेही त्यांनी लेखन केले. त्यात 'ट्रायल्स ऑफ ग्रेट मॅन', 'भारतातील न्यायिक प्रशासन', 'अश्लीलता आणि कायदा' तसेच 'आंतरराष्ट्रीय कायदा' यांचा समावेश होतो. या अष्टपैलू कामगिरीमुळेच काकासाहेबांचा खरा वारसदार म्हणून विठ्ठलरावांकडे आदराने पाहावे लागते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news