पुणे : नियम डावलून व्यवस्थापन कोट्याचे प्रवेश

पुणे : नियम डावलून व्यवस्थापन कोट्याचे प्रवेश

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) प्रवेश फेर्‍या संपल्या नसतानाही प्रवेशांबाबत पुणे,पिंपरी-चिंचवडसह राज्यातील नामांकीत महाविद्यालयांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नियम डावलून व्यवस्थापन कोट्याचे प्रवेश सुरू आहेत. या संपूर्ण प्रकारात सीईटी सेल आणि तंत्रशिक्षण संचालनालयाकडून (डीटीई) चौकशीचे आदेश देण्यात आले.

मात्र, प्रत्यक्ष कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे या संबंधित महाविद्यालयांवर निरीक्षक नेमण्यात यावा, अशी मागणी पुढे आली आहे. सीईटी सेलकडून इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, फार्मसी, एमसीए, आर्किटेक्चर आणि लॉ अशा पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 17 'सीईटी' घेण्यात आल्या. या परीक्षांच्या निकालातील गुणांनुसार सध्या प्रवेशप्रक्रिया सुरू असून, प्रवेश फेर्‍या पूर्ण झालेल्या नाहीत.

असे असतानाही पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह राज्यातील अन्य महानगरांमधील महाविद्यालयांनी 'व्यवस्थापन कोट्या'च्या जागा भरल्या आहेत. काही दिवसांनी पारदर्शक कारभाराच्या नावाखाली महाविद्यालयांकडून 'अ‍ॅडजस्टमेंट' करून हे प्रवेश दाखविण्यात येतील. त्यामुळे गुणवत्ता असणार्‍या विद्यार्थ्यालाही प्रवेश मिळविणे अवघड झाले आहे. या प्रकाराची युवासेनेकडून महाविद्यालयांच्या नावासह तक्रारही करण्यात आली होती.

सीईटी सेलने प्रवेशांना मान्यता मिळणार नाही, असे स्पष्ट केले. तर, डीटीईने संबंधित महाविद्यालयांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. याबाबत युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन आणि डीटीईचे संचालक डॉ. अभय वाघ यांची भेट घेउन, त्यांना संबंधित नामांकीत महाविद्यालयांवर निरीक्षक बसवण्याची मागणी केली आहे. प्रवेशप्रक्रियेचे सर्व अधिकार सीईटी सेलकडे असल्याने, सेलने कारवाई करून, प्रामाणिक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.

रिक्त जागांची माहिती मिळायला हवी
खासगी महाविद्यालयांच्या व्यवस्थापन कोट्याची प्रवेशप्रक्रिया माहिती पुस्तिकेतील नियम 13 प्रमाणेच व्हायला हवी. त्यानुसार कॅपच्या प्रवेश फेर्‍या संपल्यानंतर रिक्त जागांच्या प्रवेशासाठी जाहिरात प्रसिद्ध करणे, त्याबाबतची माहिती वेबसाइटवर प्रसिद्ध करणे, सर्वाधिक गुण असलेल्या विद्यार्थ्याला व्यवस्थापन कोट्यातून पहिला प्रवेश देणे, अशी प्रक्रिया पार पाडायची आहे. मात्र, या प्रवेशप्रक्रियेची माहितीच समोर येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रवेश नेमके कोणाला मिळाले, याबाबत माहितीच मिळत नाही. या पार्श्वभूमीवर व्यवस्थापन कोट्याची प्रवेशप्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी सीईटी सेलने माहिती प्रसिद्ध करण्याबाबतचे आदेश द्यावे, अशी मागणी पुढे आली आहे.

पुण्यासह राज्यात मनमानी पद्धतीने व्यवस्थापन कोट्याची प्रवेशप्रक्रिया राबविणार्‍या महाविद्यालयांवर कारवाई करण्यासोबतच निरीक्षक नेमण्यात यावे, अशी प्रमुख मागणी आहे. ही प्रवेशप्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी, त्याची माहिती अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यत पोहोचविणे गरजेचे आहे. याबाबत सीईटी सेल आणि डीटीईने कार्यवाही न केल्यास, आंदोलन करण्यात येईल.
                                                           – कल्पेश यादव, सहसचिव, युवासेना

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news