पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाला गती ! लष्कराने आक्षेप घेतलेली जागा वगळली

पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाला गती ! लष्कराने आक्षेप घेतलेली जागा वगळली

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या कामात आलेली अडचण दूर झाली. लष्कराने आक्षेप घेतलेली जागा वगळून पर्यायी जागेतून आता रेल्वेमार्ग नेला जाणार असून, त्यासाठी पुन्हा भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग हा खेड तालुक्यातील संरक्षण विभागाच्या जागेजवळून जात होता. त्यामुळे या कामाला संरक्षण विभागाकडून आक्षेप घेण्यात आला. त्या ठिकाणची भूसंपादन प्रक्रिया थांबविण्यात आली होती. परिणामी, पर्यायी गावांमधील जागा संपादित करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने विचार सुरू केला होता.

त्यामुळे पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला गती मिळणार आहे. खेड तालुक्यात लष्कराचे स्फोटक नष्ट करण्याचे केंद्र असून, पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पामुळे त्याला बाधा येत आहे, असा आक्षेप घेतला होता. रेल्वेकडून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करताना संरक्षण विभागाकडून आक्षेप घेण्यात आला नव्हता. अचानक आक्षेप घेण्यात आल्याने तेथील काम थांबविण्यात आले होते. दरम्यान, यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून नव्याने जागेचा शोध सुरू करण्यात आला होता. त्या शोधानंतर अखेर खेड तालुक्यातील नवी जागा शोधण्यात आली. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी खेड तालुक्यातील तेरा गावांतून हा प्रकल्प आता जाणार आहे.

त्यामुळे रेल्वे प्रशासनाने त्या तेरा गावांच्या भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात कार्यवाही करण्यासाठी खेडच्या प्रांताधिकार्‍यांकडे या जागेचा भूसंपादनाचा प्रस्ताव पाठविला आहे. आता खेड प्रांताधिकार्‍यांकडून भूसंपादन करण्यासाठी जमीन खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणच्या जागा खासगी जमिनी असून, त्या वाटाघाटी स्वरूपातून खरेदी प्रक्रिया करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news