पुणे; पुढारी वृत्तसेवा : हडपसर टर्मिनलला पिण्याचे पाणी नाही… स्वच्छतागृह नाही… प्रवाशांसाठी प्रशस्त प्रतीक्षालय नाही… स्थानकापासून शहरात विविध ठिकाणी जाण्यासाठी फीडर सेवा नाही… ही स्थिती हडपसर टर्मिनल येथे पाहायला मिळाली. पुणे रेल्वेस्थानकावरील यार्ड रिमॉडलिंगच्या कामामुळे रेल्वे प्रशासनाचे पुण्यातील काही गाड्या हडपसर टर्मिनल येथे हलविण्याचे नियोजन आहे.
त्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना हडपसर येथे पायाभूत सुविधा व्यवस्थितरीत्या मिळणार का? याची बुधवारी दै. 'पुढारी'च्या प्रतिनिधीने पाहणी केली. या वेळी हडपसर टर्मिनलवरील पायाभूत सुविधांचे तीन तेरा वाजल्याचे पाहायला मिळाले. पुणे रेल्वेस्थानकावरचा ताण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नुकत्याच 2 डेमू गाड्या या ठिकाणी हलविल्या आहेत आणि आणखी गाड्या हलविण्याचे नियोजन आहे. मात्र, सध्या येथे पायाभूत सुविधा नसल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. प्रवाशांना आपल्या बॅगा घेऊन लांबपर्यंत पायपीट करावी लागत आहे.
टर्मिनलचा विकास कधी?
हडपसर टर्मिनलचा विकास करण्यासाठी बजेटमध्ये करोडो रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद गेल्या काही वर्षांपासून तशीच आहे. मात्र, रेल्वे प्रशासन भूसंपादनाची कारणे देत हडपसर टर्मिनलच्या विकासाची ढकलगाडी करीत आहे. त्यामुळे निधी मिळूनही प्रशासन स्थानकाचा विकास करण्याला विलंब का करीत आहे? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
स्थानकावर या सुविधा हव्यात
फीडर सेवा वाढविण्याची गरज…
पीएमपीच्या बस येथे जाण्यासाठी स्थानकाला जोडणारे अरुंद रस्ते मोठे करण्याची गरज
हडपसर टर्मिनल एखाद्या गावच्या स्थानकाप्रमाणे दिसते. त्यामुळे त्याचा पुणे स्थानकाप्रमाणे विकास होणे अपेक्षित आहे.
सुसज्ज प्रतीक्षालय, स्वच्छतागृहांची येथे व्यवस्था करावी,
पिण्याच्या पाण्याची सोय करावी,
तिकीट काउंटरच्या संख्येत वाढ करावी
रिक्षाचालक अवाच्या सव्वा भाडे आकारतात, त्यांना कडक नियम लावणे आवश्यक आहे
टर्मिनलवर अनाउन्समेट सुविधा सुरू करावी
प्रवाशांचे ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण होण्यासाठी कव्हर शेड टाकावेत
टर्मिनलवर प्लॅटफॉर्मची संख्या वाढवावी,
फूट ओव्हर ब्रिज, सरकता जिना, लिफ्टची व्यवस्था करावी
हडपसर स्टेशनवर प्राथमिक पायाभूत सुविधा नाहीत. प्रशासनाने फिल्टर पाण्याचे मशिन, व्हीलचेअर, प्रशस्त मोठे वेटिंग रूम, प्लॅटफॉर्मवर रॅम्प, फीडर सेवा यांसारख्या विविध सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात. यासंदर्भात डीआरयूसीसी मीटिंगमध्ये याविषयी आम्ही मागणी करणार आहोत तसेच पीएमपी अध्यक्षांची भेट घेणार आहे.
– निखिल काची,
रेल्वे सल्लागार समिती सदस्य, पुणे विभागरेल्वेने हडपसरला टर्मिनल करावे, याला आमचा विरोध नाही. मात्र, येथे प्राथमिक सुविधा प्रशासनाने द्यायला हव्यात. तुम्ही गाड्या हडपसरवरून सोडणार आणि त्यांना सुविधाच देणार नाही, मग आमची चिडचिड होणारच. त्यामुळे येथे प्राधान्याने पायाभूत सुविधा पुरविण्यावर भर द्यावा.
– विकास देशपांडे, क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य, मुंबई