Pune Political News: निवडणुकीच्या तयारीत असलेल्या आणि उमेदवारी न मिळालेल्या भाजपमधील इच्छुक बंडोबा अखेर फडणवीस अस्त्राने थंड झाले असून, ते कामाला लागले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकाशी संवाद साधून त्यांची नाराजी दूर केली. त्यामुळे भाजपसह महायुतीच्या उमेदवारांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
शहरातील आठपैकी सहा जागा भाजपकडे आहेत. त्यात पाच ठिकाणी पुन्हा विद्यमान आमदारांनाच पक्षाने उमेदवारी दिली. तर कसबा पेठमध्ये गतनिवडणुकीत पराभूत झालेल्या हेमंत रासने यांना संधी देण्यात आली.
त्यामुळे सहाही मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये नाराजीचे सूर उमटले होते. त्यात काहींनी थेट बंडाचा पवित्रा घेतला होता. त्यामध्ये प्रामुख्याने कोथरूडमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात अमोल बालवडकर, पर्वतीमध्ये श्रीनाथ भिमाले, कसबा पेठमध्ये शहराध्यक्ष धीरज घाटे, वडगाव शेरीत माजी आमदार जगदिश मुळीक यांचा समावेश होता.
मात्र, या सर्वांशी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वैयक्तिकरीत्या संवाद साधला, त्यांची समजूत काढली. काहींना भविष्यात संधी देण्याचे आश्वासनही दिले. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपसह महायुतीमधील जवळपास शंभर टक्के बंडखोरी रोखण्यात फडणवीस अस्त्र यशस्वी ठरले आहे.
त्यात बालवडकर यांनी कालच आपली भूमिका जाहीर केली, तर मंगळवारी केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह भिमाले आणि घाटे यांनी उपस्थित राहात आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले.