महापालिकेने उचलली बेवारस वाहने; तक्रारी पाठवण्याचे नागरिकांना आवाहन

महापालिकेने उचलली बेवारस वाहने; तक्रारी पाठवण्याचे नागरिकांना आवाहन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील रस्त्यांच्या कडेला धूळ खात उभ्या असलेल्या बेवारस वाहनांमुळे वाहतूक कोंडीमध्ये भर पडत असून, महापालिकेकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे वृत्त दैनिक 'पुढारी'ने प्रसिद्ध केल्यानंतर अतिक्रमण विभागाने बेवारस वाहने जप्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेमध्ये 139 वाहने जप्त केली असून, वाहने हटवण्याची नोटीस चिकटवण्याचेही काम सुरू केले आहे.

शहरात 15 वर्षांहून अधिक जुनी झालेली तब्बल एक लाखांहून अधिक दुचाकी आणि चारचाकी वाहने आहेत. नियमानुसार, संबंधित वाहनमालकांनी ही वाहने स्क्रॅप करणे आवश्यक आहे. मात्र, ही वाहने स्क्रॅप करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नसल्याने ही वाहने घराबाहेर, रस्त्यांच्या कडेला आणि सार्वजनिक जागांवर उभी केली जातात. या वाहनांचा वाहतुकीला अडथळा होऊन वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांनाही सहन करावा लागतो. दुसरीकडे वाहनांच्या खाली कचरा साचून दुर्गंधी सुटते. तसेच या वाहनाचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विशेष म्हणजे पोलिस ठाणी, पोलिस चौक्या आणि वाहतूक पोलिसांची कार्यालये आदींच्या परिसरात सर्वाधिक वाहने उभी आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अशी वाहने हलवण्यासाठी आरटीओच्या मदतीने वाहनमालकांना नोटीस बजावली जाते. नोटीस बजावल्यानंतरही वाहने न हलविल्यास वाहतूक पोलिसांच्या मदतीने कारवाई केली जाते. मात्र, मागील काही महिन्यांपासून ही कारवाई बंद होती. यासंदर्भात दैनिक 'पुढारी'ने नुकतेच वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने बेवारस वाहने जप्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

वाहन उचलण्यापूर्वी क्षेत्रीय कार्यालयातर्फे संबंधित वाहनांवर नोटीस चिकटवण्यात येईल. त्यानंतर सात दिवसांत वाहन न हटवल्यास हे वाहन जप्त केले जाईल. आतापर्यंत 139 वाहने जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय आपल्या परिसरातील बेवारस वाहनांची माहिती 96 899 31 900 या व्हॉटसअ‍ॅप नंबरवर फोटो आणि लोकेशनसह पाठवावी, असे आवाहन पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी केले आहे. या मोहिमेत जप्त केलेली वाहने निर्मूलन शुल्क भरून परत नेता येतील. प्रवासी बस, ट्रकसाठी 25 हजार, दहा टन वजनांपर्यंतच्या हलक्या वाहनांसाठी 20 हजार, चारचाकी वाहनांसाठी 15 हजार, तीनचाकी वाहनांसाठी दहा हजार, दुचाकींसाठी पाच हजार रुपये शुल्क भरून संबंधित वाहनमालक एक महिन्याच्या वाहन सोडवता येईल.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news