

पुणे : आता विद्यार्थ्यांना विविध सरकारी दाखल्यांसाठी महाविद्यालयाबाहेर हेलपाटे मारावे लागणार नाहीत. लवकरच जिल्ह्यांतील 200 हून अधिक महाविद्यालयांमध्ये ’आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू केले जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने ही माहिती दिली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्रासह उत्पन्न, रहिवास अशा महत्त्वाच्या 17 सेवांचा लाभ थेट महाविद्यालय परिसरात मिळणार आहे. (Pune Latest News)
अहिल्यानगर जिल्ह्यातील 10 तालुक्यांतील 15 महाविद्यालयांत हा प्रयोग यशस्वी ठरला असून, त्याच धर्तीवर पुण्यासह राज्यातील 200 हून अधिक महाविद्यालयांमध्ये हे केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
महाविद्यालयांत सेवा केंद्र सुरू करण्यासाठी संबंधित महाविद्यालयांनी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव मांडणे आवश्यक आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे 29 ऑगस्ट रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून, मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे प्राचार्य या कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत. या वेळी विद्यार्थ्यांना केंद्रामार्फत कोणकोणत्या सेवा दिल्या जाणार आहेत, त्याची माहिती दिली जाईल.
महाविद्यालयाकडून मागणी आल्यानंतर तो प्रस्ताव पालकमंत्र्यांकडे मान्यतेसाठी पाठविला जातो. मान्यता मिळाल्यावर जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक माहिती संकलित करून ती महाआयटीला पाठवली जाते. त्यानंतर महाआयटीकडून संबंधित महाविद्यालयाला लॉगिन आयडी व पासवर्ड उपलब्ध करून देण्यात येतो.
’आपले सरकार सेवा केंद्र’च्या माध्यमातून दिल्या जाणार्या प्रत्येक दाखल्यासाठी 59 रुपये शुल्क आकारले जाते. त्यातील 32 रुपये सेवा केंद्र चालविण्यासाठी दिले जातात. त्यामुळे महाविद्यालयाने हे केंद्र सुरू केल्यास त्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध होईल तसेच ’कमवा आणि शिका’ योजनेअंतर्गत विद्यार्थी ही सेवा पुरवू शकतील, ज्यामुळे सरकारवरील आर्थिक भारही काही प्रमाणात हलका होईल.
हे केंद्र सुरू करण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाला स्वतंत्र पायाभूत सुविधा उभारण्याची गरज नाही. महाविद्यालयातील विद्यमान संगणक, इंटरनेट आणि प्रिंटरच्या साहाय्याने ’आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू करता येणार आहे.