Pune News: लोहमार्ग ओलांडताना एका तरुणाच्या दोन्ही पायावरून रेल्वे मालगाडी गेल्याने त्याचे दोन्ही पाय तुटले. त्यामुळे मोठा रक्तस्राव होऊन संबंधित तरुण मृत्यूच्या दाढेत सापडला होता. मात्र, रेल्वे पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने वेळेत उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले. भिगवण रेल्वे स्टेशन येथे बुधवारी (दि. 6) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
आकाश रायते (वय 27) असे जखमी तरुणाचे नाव आहे. रेल्वे पोलीस हवालदार नवनाथ पवार, रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक पोलीस निरीक्षक एन. एस. लोंढे, रुग्णवाहिकाचालक केतन वाघ, आकाश दंडवते आदी त्याच्यासाठी देवदूत ठरले.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, आकाश रायते हा बुधवारी भिगवण रेल्वेस्थानकातून रेल्वेरुळ ओलांडत होता. त्या वेळी अचानक आलेल्या मालगाडीखाली तो सापडला. त्याच्या दोन्ही पायांवरून मालगाडी गेली. असह्य वेदनेने तो विव्हळत असताना रेल्वे पोलीस हवालदार नवनाथ पवार यांनी धाव घेत त्याच्या मदतीसाठी प्रयत्न सुरू केले. तसेच भिगवण येथील रुग्णांसाठी कायम धावणारे केतन वाघ यांनी नावाने सुरू केलेली रुग्णवाहिका काही क्षणात घटनास्थळी पोहचली.
त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक पोलीस निरीक्षक एन. एस. लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली रायते याला प्रथम लोणी येथील विश्वराज हॉस्पिटल येथे दाखल केले. तिथे प्राथमिक उपचार करून पुढील उपाचारार्थ त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे ससूनमधील डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
जिवावरचे बेतले पायावर
वास्तविक, या अपघाताचा फोटो व व्हिडीओ पाहता आकाशने दोन्ही पाय गमावले असले, तरी त्याचा जीव मात्र वाचला आहे. फोटो व व्हिडीओत रायते याचे नडग्यांपासून पाय वेगळे झाल्याचे व त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना गहिवरून आले.