

अकोले, पुढारी वृत्तसेवा : मी गृहमंत्री झालो, तर महायुतीतील ६० ते ७० टक्के नेते कायमचे गुवाहाटीला जाऊन बसतील. त्याचबरोबर महायुतीतील भ्रष्टाचारी नेत्यांना सोडणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिला. अकोले येथे आज (दि.९) उमेदवार अमित भांगरे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
अकोले विधानसभा मतदारसंघात पंचरंगी लढत होत असून शरद पवारांनी अमित भांगरे यांना मैदानात उतरवले आहे.
दरम्यान, प्रचारसभेत रोहीत पवारांनी महायुती सरकार विरोधात तुफान फटकेबाजी करत गृहमंत्री झालो, तर सत्तेतील साठ सत्तर टक्के नेते कायमचे गुवाहाटीला जावून बसतील, असे वक्तव्य केले. आम्ही सेटलमेंट न करणारे लोक आहोत. गृहमंत्री पद चुकून मिळाले, तर भाजप, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षातील काही लोक महाराष्ट्रात न राहता कायमचे गुवाहाटीला जावून राहतील, असे ते म्हणाले.