चाकण : थरारक अपघातातून तरुण-तरुणी बचावले

चाकण : थरारक अपघातातून तरुण-तरुणी बचावले

चाकण; पुढारी वृत्तसेवा : पुणे – नाशिक महामार्गावर चाकण येथील आंबेठाण चौकाच्या जवळील उड्डाणपुलावर एक थरारक अपघात घडल्याची घटना सोमवारी (दि. 5) दुपारी घडली. अवजड ट्रकखाली आलेली तरुणी यातून बचावली; शिवाय याच अवजड ट्रकला मागून धडकलेल्या मोटारीचा चालकदेखील बचावला. भीषण अपघात झाला पण मृत्यूच्या दाढेतून दोघे बचावल्याने "देव तारी त्याला कोण मारी" चा प्रत्यय आल्याची चर्चा दिवसभर सुरू होती.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, रस्ता ओलांडत असलेल्या तरुणीला खेड बाजूकडे जाणार्‍या अवजड वाहनाने धडक दिली. तरुणीला वाचविण्याच्या प्रयत्नात अवजड वाहनचालकाने आपले वाहन ब्रेक दाबून थेट रस्त्याच्या लगत असलेल्या दुभाजकावर घातले. नेमक्या त्याच वेळी पाठीमागून आलेली मोटार ट्रकवर पाठीमागून आदळली.

अवजड वाहनाच्या धडकेने संबंधित तरुणी अवजड वाहनाखाली जाऊन अडकली. तरुणीचे केस अवजड ट्रकच्या चाकाखाली अडकल्याने जखमी तरुणीला बाहेर काढता येईना. अखेर अवजड वाहनाच्या चाकाखाली अडकलेले तरुणीचे केस कात्रीने कापून तिला बाहेर काढण्यात आले. जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात पाठवण्यात आले. मोटारीच्या समोरील भागाचा चक्काचूर होऊनही चालक मात्र अपघातातून बचावला.

दरम्यान अपघातानंतर पळून जाणार्‍या अवजड ट्रकचालकाला पाठलाग करून चाकणमधील सामाजिक कार्यकर्ते विशाल बारवकर यांनी पाठलाग करून पकडले व वाहतूक पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान अपघातातील तरुणीची प्रकृती सायंकाळपर्यंत स्थिर असल्याचे समजते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news