

पुणेः पुढारी वृत्तसेवा : कार पार्क करत असताना घराच्या गेटला धक्का लागल्याच्या कारणातून एकाने महिलेच्या कानशिलात लगावत तिचा विनयभंग केला. पुण्यातील साळुंके विहार- कोंढवा परिसरात बुधवारी (दि.19) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी एका 38 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी विश्वास भापकर याचेविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. भापकर हा प्लॉट खेरदी- विक्रीचा व्यवसाय करतो, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी भापकर हे एकाच परिसरात राहण्यास आहेत. फिर्यादी महिला बुधवारी रात्री त्यांची कार सोसायटीच्या आवारात पार्क करत असताना कारचा धक्का आरोपीच्या घराच्या गेटला लागला होता. या कारणावरून विश्वास भापकर याने घराबाहेर येत महिलेशी असभ्य वर्तन करत तिच्या अंगावर धावून जाऊन तिचा हात पकडून तिच्या कानशिलात लगावली. तसेच तिची गचंडी पकडून झटापट करून, तिच्या शरीरास हात लावून तिला जोराने धक्का देत जमिनीवर पाडले.