कुणेवाडीत आढळलेल्या कोल्ह्याचा मृत्यू

कुणेवाडीत आढळलेल्या कोल्ह्याचा मृत्यू
Published on
Updated on

टाकवे बुद्रुक : पुढारी वृत्तसेवा : आंदर मावळ भागातील कुणेवाडी गावाच्या हद्दीत आढळलेल्या अशक्त तसेच आजारी कोल्ह्याचा वेळेत प्राथमिक उपचार न मिळाल्याने प्रवासादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने प्राणिमित्रांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
काल सकाळी सातच्या सुमारास आंदर मावळ भागातील कुणे गावाच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला अरुण ठाकर यांना एक मादी कोल्हा आढळला. त्यांनी वनमजूर पोपट हिले यांना कळविले. वनमजूर हिले यांनी त्वरित घटनास्थळी दाखल होत कोल्ह्याची पाहणी केली. कोल्ह्याच्या तोंडातून लाळ गळत असल्याचे व तो अशक्त असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यांनी वनविभागाच्या अधिकार्‍यांना कळविले. वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील मंतावर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सखाराम बुचडे, वनरक्षक नवनाथ नीलखे, वनरक्षक वाघापुरे, वन्यजीवरक्षक मावळ संस्थेचे जिगर सोलंकी, दक्ष काटकर, निनाद काकडे, सत्यम सावंत हे पोहोचले. टाकवे येथील शासकीय डॉक्टर नितीन मगर यांच्याशी संपर्क साधला असता, ते वडेश्वर येथे कामात व्यस्त होते. त्यानंतर कामशेत, वडगाव, तळेगाव येथील शासकीय डॉक्टरांशी संपर्क साधला असता ते बाहेर असल्याचे सांगितल गेले. त्यानंतर उपचारासाठी पुण्याला न्यायच्या तयारीत असतानाच कोल्ह्याचा मृत्यू झाला.

मावळ भागांत डोंगरदर्‍याशेजारीच मानववस्ती आहे. काही प्राणी अन्नपाण्याच्या शोधात मानवस्तीकडे जातात. रस्त्यात मोटारीच्या धडकेत किंवा कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी होतात. अशावेळी ही जनावरे खूप घाबरलेली असतात. त्या वेळी वनअधिकार्‍यांसोबत सामाजिक संस्था प्राण्याचा बचाव करायला जात असताना सोबत वैद्यकीय अधिकारी असायला हवा. जखमी झालेल्या जनावराला इंन्जेक्शन देऊन नॉर्मल केले, तर त्यांची दगावण्याची शक्यता कमी होईल.
                              – अनिल आंद्रे, अध्यक्ष, वन्यजीवरक्षक संस्था मावळ पुणे

…तर वन्यप्राण्यांचा वाचेल जीव
मावळ तालुक्यात वन्यजीवांची संख्या खूप दुर्मिळ होत चालली आहे. उरलेल्या प्राण्यांना आपण सुरक्षित ठेवण्याची मोठी गरज आहे. जखमी अथवा आजारी वन्यप्राण्यांचा जीव वाचविण्यासाठी वनविभागाकडे सर्व गोष्टींची पूर्तता होणे आवश्यक आहे. वनविभागाकडे तालुक्यासाठी वन्यप्राण्यांवर उपचार करण्यासाठी एक स्वतंत्र डॉक्टर, एक प्रशस्त दवाखाना आणि वन्यप्राण्यांना पकडण्यासाठी सर्व साहित्य असणे आवश्यक आहे. तर कुठेतरी जखमी वन्यप्राण्यांचा जीव वाचविण्यासाठी वनविभागाला तसेच वन्यजीवरक्षक संस्थेला यश येण्यास मदत होईल व लगेचच त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडता येईल, अशी माहिती प्राणीमित्र जिगर सोळंकी यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news