लालजर्द गरदार रेड डायमंड पेरू खातोय भाव !

लालजर्द गरदार रेड डायमंड पेरू खातोय भाव !
Published on
Updated on

पुणे : कलिंगडाच्या गरासारखा गर व लालजर्द रंग असलेल्या रेड डायमंड पेरूची गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात आवक सुरू झाली आहे. पेरूचा हंगाम नसतानाही रेड डायमंड पेरू नावाचे वाण मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. बियांचे प्रमाण कमी, तसेच कलिंगडाचे गरदार व लालजर्द रंग असणार्‍या या पेरूला घाऊक बाजारात मागणी चांगली असल्याने किलोला 55 ते 60 रुपये दर मिळत आहे. अन्य पेरूंच्या तुलनेत या पेरूचे दर दुप्पट असल्याचे सांगण्यात आले.

बारामती तालुक्यातील सांगवी गावातील अलंकार तावरे यांच्या शेतातून हा पेरू गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात दाखल होऊ लागले आहेत. बारामती भागातून दररोज तीनशे ते चारशे किलो पेरू बाजारात विक्रीसाठी घेऊन येत आहे. बाजारात असलेल्या पिंक तैवान, लखनऊ सरदार 49 या पेरूंच्या तुलनेत रेड डायमंड पेरूला चांगली मागणी आहे. सध्या बाजारात या पेरूच्या किलोला 55 ते 60 रुपये भाव मिळत आहे. कमी बिया, कलिंगडासारखा लालजर्द रंग व गरद असलेला हा पेरू खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल असल्याचे सांगण्यात आले.

रेड डायमंड पेरूची वैशिष्ट्ये
हा पेरू बाहेरून पोपटी पांढरट रंगाचा व चमकदार असतो. याचे वजन कमीत कमी 200 ग्रॅम, तर जास्तीत जास्त 700 ग्रॅमपर्यंत जाते. याचा गर गडद लाल रंगाचा व अन्य पेरूच्या तुलनेत जास्त असतो. यामध्ये अन्य पेरूच्या तुलनेत कमी बिया असतात व त्या मध्यभागी असतात. तोडीनंतर हे फळ आठ ते दहा दिवस टिकते. या झाडाच्या लागवडीनंतर पंधरा ते वीस वर्षे उत्पादन हाती येते.

पहिल्यांदाच पाऊण एकरात 450 रोपांची लागवड केली आहे. दोन वर्षांनंतर दररोज दोनशे ते तीनशे किलो पेरू येत आहेत. बाजारात त्याला दरही चांगले मिळत आहे. बाजारात मिळत असलेल्या दरामुळे समाधान आहे. येत्या काळात या पेरूचे उत्पादन वाढविण्यात येईल. – अलंकार तावरे, शेतकरी

उपलब्ध पेरू व त्यांचे दर
पेरू दर (प्रतिकिलो)
पिंक तैवान 15 ते 35 रुपये
लखनौ सरदार 49 10 ते 25 रुपये
रेड डायमंड 55 ते 60 रुपये

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news