

पुणे : पुढारी वृत्तसेवा :
मुले अभ्यास करीत नाहीत, अभ्यासाचा कंटाळा येतो, अभ्यासात सातत्य नाही, आत्मविश्वासाचा अभाव आहे, असे प्रश्न तुम्हाला पडत असतील, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जी-20 परिषदेच्या निमित्ताने सुरू असलेल्या 'पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र' या प्रदर्शनात या प्रश्नांची उत्तरे निश्चित मिळू शकतील. विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणाची मेजवानी मिळू लागली आहे. येथे वैविध्यपूर्ण शैक्षणिक साधनांचे अनोखे प्रदर्शन भरले आहे. जी-20 परिषदेंतर्गत शिक्षण कार्यगटाची बैठक पुण्यात होत आहे. या अनुषंगाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून कृतीआधारित शिक्षण पद्धतीद्वारे मुलांना आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठीच्या शैक्षणिक साधनांचे, शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीसाठी उपक्रमांचा प्रदर्शनात समावेश आहे. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
प्रदर्शनात शंभरहून अधिक शिक्षण संस्था आणि उत्पादकांची दालने आहेत. युनिसेफ, एनएसडीसी, एनसीईआरटी, नॅशनल बुक ट्रस्ट, भारतीय नॉलेज सिस्टिम्स डिव्हिजन, मायक्रोसॉफ्ट, गुगल, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, विविध राज्य सरकारांचे शैक्षणिक उपक्रम आदींचा त्यात समावेश आहे. आदर्श बालवाडी विविध भाषांतील पुस्तके, 40 विज्ञान प्रयोगांची माहिती देणारी सायकल, खेळ आणि अभ्यासाचे महत्त्व, कौशल्य अभ्यासक्रम, भारतीय पारंपरिक खेळ, पूर्व प्राथमिकसाठी डिजिटल अभ्यासक्रम, वाचन, गणन आणि लेखन कौशल्ये विकसित करण्यासाठीची खेळणी, प्रात्यक्षिके, कोडी, आभासी वास्तव असे वैविध्यपूर्ण साहित्य प्रदर्शनात मांडण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील शाळांतील विद्यार्थी, शिक्षकांनी या प्रदर्शनाला शुक्रवारी भेट दिली. हे प्रदर्शन 22 जूनपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत विनामूल्य खुले राहणार आहे.
प्रदर्शन आवर्जून का पाहावे?
पायाभूत क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षणासाठी
मुलांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, अध्यात्मिक विकासासाठी
लेखन, वाचन व गणन या प्रक्रिया सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी
मुलांची बुद्धिमत्ता आणि कौशल्यात वृद्धी करण्यासाठी
आकलन, निरीक्षण, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण, निर्णय प्रक्रिया या मूलभूत प्रक्रिया विकसित होण्यासाठी