leopard attack : शिंगवे येथील दोन वर्षाच्या मुलाला बिबट्याने पळवल्याची शक्यता

leopard attack : शिंगवे येथील दोन वर्षाच्या मुलाला बिबट्याने पळवल्याची शक्यता
Published on
Updated on

पारगाव : पुढारी वृत्तसेवा : leopard attack : शिंगवे (ता. आंबेगाव, जि.पुणे) येथील गाढवे वस्तीतून सोमवारी (दि. ८) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दोन वर्षाचा मुलगा अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. मुलाला बिबट्याने पळवून नेल्याचा स्थानिक नागरिकांचा दाट संशय आहे. कृष्णा विलास गाढवे असे बेपत्ता मुलाचे नाव आहे. वनविभागाने येथील ऊस शेतात मुलाला शोधण्याची मोहीम सुरु केली आहे.

अधिक माहिती अशी की, शिंगवे गावाच्या उत्तरेला गाढवेवस्ती आहे. येथे राहणाऱ्या विलास कुंडलिक गाढवे यांचा दोन वर्षांचा कृष्णा ओट्यावर खेळत होता. त्यानंतर तो साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घराच्या पूर्व दिशेला पाण्याच्या टाकी जवळ गेला असता अचानक बेपत्ता झाला. कृष्णा दिसेना म्हणून त्याच्या आई सविताने इतर घरांमध्ये कृष्णाचा शोध घेतला. परंतु कृष्णा सापडला नाही. संपूर्ण मळ्यातील घरांमध्ये देखील कृष्णाला पाहिले. परंतु, कृष्णा सापडला नाही. त्यानंतर कृष्णाला बिबट्यानेच पळवून नेल्याचा संशय बळावला.

गेल्या अनेक दिवसांपासून गाढवे वस्तीत बिबट्यांचा वावर आहे. येथील स्थानिक नागरिकांनी अनेकदा एका वेळेस दोन-तीन बिबटे अनेकदा पाहिले आहेत. त्यामुळे कृष्णा गाढवे या दोन वर्षाच्या मुलाला बिबट्याने पळवून नेल्याचा संशय स्थानिक नागरिकांना आहे. विलास गाढवे यांच्या घरापाठीमागे रिकामे शेत आहे. त्या शेताच्या पलीकडे सर्व उसाची शेते आहेत. पोलिस पाटील गणेश पंडीत, नारायण गाढवे, प्रकाश गाढवे, नितीन वाव्हळ, नविनाताई गाढवे यांनी वन विभाग व मंचर पोलिस ठाण्यात घटनेची खबर दिली. दुपारी साडेबारा वाजता वनविभागाचे वनपाल विजय वेलकर, एन. एम. आरुडे, वनरक्षक पुजा पवार, डी. एस. शिवशरण, बीटअंमलदार कैलास कड, संपत भोर, शरद जाधव यांनी उसाच्या शेतात पाहणी केली. परंतु कृष्णाचा शोध लागला नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news