संगणकात टंगस्टन सेलेनाईडची चिप; 1 लाख पटींनी गती वाढणार

संगणकात टंगस्टन सेलेनाईडची चिप; 1 लाख पटींनी गती वाढणार

पुणे, पुढारी वृत्तसेवा : संगणकाची गती ही त्यातील मायक्रो चिपवर अवलंबून असते. या चिप तयार करताना प्रथमच टंगस्टन डायसेलेनाईड या सेमिकंडक्टरचा (अर्धसंवाहक) वापर करून त्याची गती एक हजार ते तब्बल एक लाख पटीने वाढविता येते, असे संशोधन पुण्यातील भारतीय विज्ञान व शिक्षण संस्था (आयसर) येथील प्रा. डॉ. आशिष अरोरा यांनी केले आहे.

प्रा. आशिष अरोरा हे आयसर पुणे येथील तरुण शास्त्रज्ञ असून, त्यांना भारतीय अणुऊर्जा विभागाने भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी यंग सायंटिस्ट पुरस्कार दिला आहे. डॉ. अरोरा यांनी जर्मनीतील म्युन्स्टर विद्यापीठातील डॉ. के. रुडॉल्फ ब्रेटचिट यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन केले आहे. हे संशोधन नुकतेच जागतिक दर्जाच्या नेचर या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झाले आहे. सध्या संगणकातील चिप्स या टर्बियन आर्यन किंवा युट्रियन वापरून तयार केल्या जातात.

डॉ. अरोरा व डॉ. ब्रेटचिट यांनी केलेल्या संशोधनात त्यांनी प्रथमच टंगस्टन डायसेलेनाईड हे अर्धसंवाहक वापरले. त्यात त्यांना संगणकाची गती एक हजार ते 1लाख पटीने वाढविता येणे शक्य असल्याचे संशोधनात सिद्ध करता आले. डॉ. आशिष अरोरा हे सध्या इंग्लंडमध्ये संशोधन करीत आहेत. मोबाईलवर त्यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी सांगितले की, संगणकात आपण सध्या विजेची ऊर्जा वापरतो म्हणजे करंट वापरतो. म्हणजेच इलेक्ट्रॉनचा वापर करतो. आमच्या संशोधनात आम्ही फोटॉन ऊर्जा वापरली आहे. फोटॉन म्हणजे प्रकाशऊर्जा (लाईट एनर्जी) होय.

काय आहे आयसर?

भारतीय शिक्षण आणि संशोधन संस्था अर्थात भारतीय विज्ञान संस्था (आयसर) ही भारत सरकारची स्वायत्त संशोधन संस्था असून, तेथे संशोधक विद्यार्थी घडवले जातात. विज्ञानातील पदवी आणि पदव्युतर अभ्यासक्रम येथे आहेत. पुणे, कोलकाता, मोहाली, भोपाळ, तिरुअनंतपुरम, तिरुपती आणि बेहरामपूर या देशांतील सात शहरांत ही संस्था आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news