

बावधन : बावधन येथे मुंबई-बंगळुरू महामार्गावर ब्रेक नादुरुस्त होऊन ट्रक उड्डाणपुलावरून थेट सेवा रस्त्यावर कोसळला. सोमवारी (दि. 26) रात्री हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. नूर मोहम्मद (वय 40) हे या ट्रकमध्ये 'एसी'चे मटेरिअल घेऊन चेन्नई येथून भिवंडीकडे जात होते. ते बावधन परिसरात आल्यानंतर ट्रकचे ब्रेक अचानक नादुरुस्त झाल्याने मोहम्मद यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बावधन येथील उड्डाणपुलावरून डाव्या बाजूला असलेल्या तीस फूट खाली सेवा रस्त्यावर हा ट्रक कोसळला. या अपघातामध्ये मोहम्मद यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
चांदणी चौकातून निघालेल्या गाड्या उताराने बावधनच्या दिशेने प्रचंड वेगात येतात. यापूर्वीही अशा प्रकारे अनेक अपघात झालेले आहेत. ट्रक थेट महामार्ग सोडून खाली सेवा रस्त्यावर येऊन पलटी होत आहेत. यामुळे महामार्ग प्रशासनाने या ठिकाणी मजबूत कठडे बांधण्याची मागणी जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अभिजित दगडे यांनी केली आहे.