

मंचर; पुढारी वृत्तसेवा: पेठ येथे रस्त्याच्या कडेला खेळत असलेल्या श्री रामकृष्ण शिंदे या दोनवर्षीय मुलाचा इनोव्हाने दिलेल्या जोरदार धडकेत मृत्यू झाला. पेठ- कारेगाव रस्त्यावर ही घटना घडली. गाडीचालक सौरभ कोंडाजी सणस (रा. सणस वस्ती, कारेगाव, ता. आंबेगाव) याच्यावर मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्याद रामकृष्ण मधुकर शिंदे (रा. पेठ, ता. आंबेगाव) यांनी दिली आहे.
श्री हा सायंकाळी सहाच्या सुमारास सणसवस्ती कारेगाव बाजूकडे जाणार्या रस्त्याच्या कडेला खेळत होता. त्या वेळी पेठकडून सणसवस्ती कारेगाव बाजूकडे येणारी इनोव्हा (गाडी क्रमांक एम.एच 14 एच.डी 9907) गाडी चालक सौरभ कोंडाजी सणस याने भरधाव वेगात आणून त्याला जोरदार धडक दिली. धडकेत मुलाच्या डोक्याला, हाताला, छातीला, पोटाला गंभीर दुखापत झाली.
उपचारासाठी ससून हॉस्पिटल पुणे येथे दाखल केले असता उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत गाडीचालक सौरभ सणसवर मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास मंचरचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जवान हगवणे करत आहेत.