पुणे: पुण्यात शुक्रवारी (दि. 13) संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शहरात जागोजागी पाणी साचले होते. शहरातील बहुतांश भागांतील प्रमुख रस्ते हे पाण्याखाली होते. पाण्याचा निचरा वेळेत न झाल्यामुळे रस्त्यांना तलावांचे रूप आले होते.
या पाण्यातूनच नागरिकांना पायपीट करावी लागली होती. दरम्यान, शहरात कमी वेळेत जास्त पाऊस झाल्याने शहराच्या विविध भागांत पाणी साठल्याचा अजब दावा महानगरपालिकेने केला आहे. भर पावसात पालिकेच्या कर्मचार्यांनी केलेल्या कामांमुळे 10 ते 15 मिनिटांत बहुतांश भागांतील पाण्याचा निचरा झाल्याचा दावा देखील अधिकार्यांनी केला आहे. (Latest Pune News)
शहरात शुक्रवारी चोवीस तासांत 52 मिलिमीटर पाऊस झाला. शुक्रवारी सायंकाळी शहरातील सर्वच भागांत जोरदार पाऊस झाला. पावसाचा जोर एवढा होता की, समोरून येणारी वाहने दिसत नव्हती. जंगली महाराज रस्ता, पौड रस्ता, कोथरूड सिटी प्राइड, अलंकार पोलिस चौकी परिसर, नरपतगिरी चौक, रास्ता पेठ, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, कात्रज, बिबवेवाडी, स्वारगेट, भांडारकर रस्ता, प्रभात रस्त्यासह मध्यवर्ती पेठेमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले होते.
पालिकेच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, झोन एकमधील गुंजन चौक, साऊथ मेन रस्ता, आर.टी. ओ. चौक, मंगळवार पेठ मेट्रो स्टेशन, रेसिडन्सी चौक, लक्ष्मीनगर धानोरी, वाघोली परिसरातील फुलमळा, आय व्ही इस्टेट या ठिकाणी पाणी साठले होते. येथील तीन ठिकाणी पावसाळी लाईन नसल्याने रस्त्यावर पाणी साठून राहिले.
तर झोन 2 मधील शिवनेरी पार्क, भाऊ पाटील रस्ता, सिंध सोसायटी, जंगली महाराज रस्ता, संचेती ग्रेड सेप्रेटर , कोथरूड डेपो, बधाई चौक आदी ठिकाणी पाणी साठले होते. झोन 3 मधील वारजे पूल, सुशीलानगरी सोसायटी, वडगाव पूल, जिजामाता भुयारी मार्ग, कात्रज चौकात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. झोन चार मधील के. के मार्केट, लेक टाऊन सिटी, स्वारगेट चौक , सेव्हन लव्हज् चौक तर झोन 5 मधील मित्रमंडळ चौक, नरपतगिरी चौक, शनि पार चौक, चंदन स्वीट येथे मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते.
पावसाचे पाणी रस्त्यावर साठल्याने पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेची यंत्रणा रस्त्यावर उतरली. पालिकेच्या अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार कमी कालावधी जास्त पाऊस झाला़. त्यामुळे काही कालावधीसाठी शहराच्या बहुतांश भागात पाणी साठले.
पुणे महानगरपालिका स्तरावर क्षेत्रीय कार्यालय निहाय पथके, तसेच पालिकेकडे असलेल्या यंत्रसामग्रीच्या मदतीने तातडीने कारवाई करून अर्ध्या तासांत पाण्याचा निचरा करण्यात आल्याचा दावा अधिकार्यांनी केला. आपत्ती व्यवस्थापन कक्ष देखील अद्ययावत करण्यात आला असून कक्षाला आलेल्या तक्रारींवर संबंधित खात्याशी समन्वय साधत 10 ते 20 मिनिटांत बहुतांश तक्रारींचे निवारण करण्यात आले, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.
काही ठिकाणी तात्पुरती, तर काही ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना
रस्त्यावरील पाण्याचा तातडीने निचरा करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना सर्व सामग्री देण्यात आली असून, गेल्या वर्षी शहरात पाणी साठणार्या 201 ठिकाणी कायमस्वरूपी व तात्पुरत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी पुरेशी पावसाळी लाइन व्यवस्था नाही त्या ठिकाणी पाहणी करून लवकरात लवकर कारवाईच्या सूचना देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.