प्रशासनाचे एक पाऊल मागे; अभय योजनेचा अद्याप निर्णय नाही

प्रशासनाचे एक पाऊल मागे; अभय योजनेचा अद्याप निर्णय नाही

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील मोकळ्या जागांच्या (ओपन प्लॉट) थकीत मिळकतकरासाठी अभय योजना राबविण्या संदर्भात केवळ चर्चा झाली आहे. अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सध्या माहिती मागविण्यात आली आहे. ती आल्यानंतर अभ्यास केला जाईल. त्यानंतरच अभय योजना राबवायची की नाही? याचा निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्टीकरण महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले. अभय योजना राबविली तरी केवळ शास्तीवर सवलत दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महापालिकेकडून शहरातील विविध इमारती, पत्राशेड, खुल्या जागा (ओपन प्लॉट) अशा विविध मिळकतींना मिळकतकर विभागामार्फत करआकारणी केली जाते. कर न भरणार्‍या मिळकतधारकांना नोटीस बजावून कर भरण्यास सांगितले जाते. नोटिशीनंतरही कर न भरणार्‍या मिळकती जप्त करून लिलाव केला जातो. महापालिकेने काही वर्षांपूर्वी शहरातील मिळकतींचा जिओ सर्व्हे केला. त्या वेळी अनेक मोकळ्या जागांची करआकारणीच झाली नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महापालिकेत मोकळ्या जागांच्या थकबाकीसाठी अभय योजना राबविण्याच्या हालचाली प्रशासनात सुरू आहेत.

याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाच्या या निर्णयावर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, मोकळ्या जागांसाठी (ओपन प्लॉट) अभय योजना आणण्याचा निर्णय अजून झालेला नाही. आम्ही त्याबाबत चर्चा करीत आहोत. मिळकतकर थकबाकीदारांसाठी आतापर्यंत काहीवेळा अभय योजना आणली गेली. परंतु, त्यात कधीही मोकळ्या जागांचा समावेश नव्हता. मोकळ्या जागा फक्त विकसकांकडेच आहेत, असे नाही; तर अनेक सर्वसामान्य नागरिकांकडेही एक, दोन गुंठ्यांचे प्लॉट आहेत. अभय योजना लागू झाल्यास त्यांना दिलासा मिळेल, असे विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले.
शहरात नक्की किती मोकळ्या जागा आहेत. त्यापैकी किती मिळकतींचा कर थकीत आहे, याची माहिती घेतली जात आहे. त्यातून एकापेक्षा अधिक मोकळ्या जागांसाठी किती जणांचा कर थकीत आहे, हे देखील समोर येईल. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असेही विक्रम कुमार यांनी नमूद केले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news