

पुणे: न्यायालयीन वादात सदनिकेची विक्री रखडल्याने मुलाच्या परदेशातील शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्याने पत्नीने न्यायालयाकडे दाद मागितली. दांम्पत्यामधील वाद समजुतीने मिटावा यासाठी न्यायालयाने हे प्रकरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मध्यस्थांकडे पाठविले. मुलाचे शैक्षणिक नुकसान तसेच वादामुळे वैळ व पैशाचा अपव्यय होणार असल्याची जाणीव करून देताच पतीने सदनिका विक्रीस होकार दिला. अन् सदनिकेच्या विक्रीअभावी मुलाच्या शिक्षणाचा परदेशवारीचा रखडलेला प्रश्न लोकअदालतीत मार्गी निघाला.
मधु आणि बाला (दोघांची नावे बदलेली आहेत) अशी पती पत्नीची नावे आहेत. बाला हा कामधंदा करत नसल्याने मधु हिने स्वत:चा ब्युटीपार्लचा व्यवसाय सुरू केला. त्यातून येणार्या पैशांद्वारे तिने दोघांच्या नावे एक सदनिका घेतली. त्यानंतर मात्र एकमेकांशी पटत नसल्याने मधु हिने पतीविरोधात घटस्फोटासाठी अर्ज करत त्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रारही दिली.
यादरम्यान, मुलगा बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याला परदेशी शिक्षणासाठी जाण्यासाठी पैशांची गरज निर्माण झाली. मधुने सदनिका विकण्याचा निर्णय घेत बालाला ही माहिती दिली. मात्र, त्यास बाला मंजूर होत नव्हता. (Latest Pune News)
यावेळी, न्यायाधीश डी. जे. पाटील यांनी सदरचे प्रकरण पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे तडजोडीसाठी पाठविले. सचिव सोनल पाटील यांनी मध्यस्थीसाठी हे प्रकरण प्राधिकरणाचे मध्यस्थ अॅड. इब्राहिम अब्दुल शेख यांवर सोपविले. मुलाचे शिक्षण तसेच त्याच्या भवितव्याबाबात माहिती दिल्यानंतर पतीने सदनिका विक्रीस मंजूरी दिली. त्यानंतर पत्नीनेही पतीविरोधातील सर्व दावे व गुन्हे मागे घेत प्रकरण मार्गी लावले.
पतीविरोधात गुन्हयासह चार दावे
मधु यांनी विवाह विच्छेदन करून मिळावा यासाठी दिवाणी न्यायाधीशाकडे अर्ज केला होता. याखेरीज, पिंपरी येथील न्यायालयामध्ये महिलांचे घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायद्याप्रमाणे बाला व त्याच्या कुटुंबियाविरुध्द गुन्हा दाखल केला होता. तसेच, पिंपरी येथील न्यायालयात फौजदारी प्रक्रियेनुसार पोटगी मिळण्याकरीता अर्ज केला होता. जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. याप्रकारे जवळपास चार ते पाच दावे मधुने पतीविरोधात केले होते.
न्यायालयात दाखल दावे तसेच गुन्ह्यामुळे दोघांचाही पैसा व वेळ वाया जाणार आहे. त्यामुळे मानसिक त्रासही मोठ्या प्रमाणात होईल अशी जाणीव दांम्पत्यांना करून देण्यात आली. दोघांमधील वादामुळे मुलाचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर पत्नीने पतीविरोधात दाखल असलेले गुन्हे व दावे मागे घेण्याची तयारी दर्शविली.
- अॅड. ईब्राहिम अब्दुल शेख, मध्यस्थ, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण.