

पुणे: वजन कमी करण्यासाठी लोक चुकीच्या पद्धतीने व्यायाम करतात. त्यामुळे त्याचे शरीरावर दुष्परिणाम होतात. खरे तर व्यायाम हा वजन कमी करण्यासाठी नाही, तर ताकद वाढविण्यासाठी करायचा असतो. खाण्यावर नियंत्रण ठेवा, स्नायूचे व्यायाम करा सर्व आजार कमी होतील. असे मत व्यायामशास्त्राचे अभ्यासक महेंद्र गोखले यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ज्ञानसत्रात वजन कमी करणे समज आणि गैरसमज या विषयावर महेंद्र गोखले बोलत होते. वजन हा एक केवळ आकडा आहे. त्याकडे लक्ष न देता, आरोग्य सांभाळण्याकडे लक्ष द्या, असा सल्लाही गोखले यांनी यावेळी दिला. (Latest Pune News)
गोखले म्हणाले, वजन कमी करण्यासाठी प्रत्येक जण व्यायाम करताना दिसत आहे. मात्र मुळात चुकीचे अन्न आणि खाण्यावर नियंत्रण नसल्यामुळे वजन वाढते. वजन कमी करण्याच्या नादात नागरिक चुकीच्या पद्धतीने कृती करतात.
त्याचा शरीराला मोठा फटका बसतो. अलीकडच्या काळात एकाच ठिकाणी बसून काम करण्याच्या पद्धतीमुळे शरीराची हालचाल कमी झाली आहे. सतत फोन आणि लॅपटॉपच्या वापरामुळे तणाव वाढत आहेत.
त्यामुळेच वजन वाढण्याचे प्रमाणही वाढले आहे. आपण जे अन्न खाणार आहोत, त्यात प्रोटीन व कॅलरीजचे प्रमाण तपासावे. तसेच कोणतेही अन्न खाण्याआधी त्याचा विचार करावा. व्यायामाने वजन कमी होते, ही मानसिकता आधी बदलली पाहिजे, असेही गोखले यांनी नमूद केले.वक्तृत्वोत्तेजक सभेच्या उपाध्यक्ष सरिता साठे यांनी गोखले यांचा सत्कार केला. रोहन बावडेकर यांनी सूत्रसंचालन केले.