

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : संत तुकारामनगर, पिंपरी येथील शिवनेरी सोसायटी येथे सहा वर्षाच्या बालकावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. कुत्र्याने मुलाचा डाव्या हाताला तीन ठिकाणी कडाडून चावा घेतला. त्यात बालक जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी (दि.9) घडली.
मोहम्मद शेख (वय 6 वर्षे) असे कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. दोन भटकी कुत्री भांडत असताना बालक त्या ठिकाणी वावरत होते. त्यातील एका कुत्र्याने बालकावर हल्ला केला. नागरिकांनी कुत्र्याला हुसकावून लावल्याने सुदैवाने बालकाची सुटका झाली. मुलाच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून 13 टाके पडल्याचे डॉक्टरांनी सांगितले. भटक्या कुत्र्याचा चावा इतका भयंकर होता की, कुत्र्याने बालकाच्या हाताचे लचके तोडले आहेत.
या घटनेमुळे शहरातील भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या मुद्दा ऐरणीवर आला आहे. या संदर्भात पशुवैद्यकीय विभागाचे उपायुक्त सचिन ढोले यांनी सांगितले की, ही घटना दुर्दैवी आहे. यासंदर्भात संबंधित पथकास सांगण्यात आले आहे. ज्या कुत्र्याने चावा घेतला तो कुत्रा पशुवैद्यकीय विभागाच्या पथकाने पकडून आणला आहे. तो नेहरूनगर येथील पॉडमध्ये ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी उघड्यावर खाद्यपदार्थ टाकू नये. त्यावर ही भटकी कुत्री जगतात. तसेच, भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नसबंदी शस्त्रक्रिया मोहीम राबवली जात आहे.