पुणे : संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचे निधन

पुणे : संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचे निधन
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मराठी साहित्यात वेगळे स्थान निर्माण करणारे व संतसाहित्याला जगभरात पोहचविणारे ज्येष्ठ अभ्यासक-लेखक आणि 'बहुरूपी भारूड'कार डॉ. रामचंद्र देखणे (वय 66) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. मंगळवारी (दि. 27) सकाळी अकरा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वारकरी संप्रदायाची परंपरा असलेल्या कुटुंबामध्ये डॉ. देखणे यांचा जन्म झाला.

बीएस्सी आणि एमए पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी पीएचडी संपादन केली. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. 34 वर्षांच्या सेवेनंतर ते निवृत्त झाले. 'संतविचार प्रबोधिनी' ही दिंडी घेऊन डॉ. देखणे अनेक वर्षे सातत्याने पंढरीची पायी वारी करीत असत.

ललित, संशोधनात्मक तसेच चिंतनात्मक, अशी त्यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यामध्ये कथा, कादंबरी, संतसाहित्यावरील चिंतनात्मक, लोकसाहित्यावरील संशोधनात्मक आणि सामाजिक विषयांवरील वैचारिक पुस्तकांचा समावेश आहे. विविध वृत्तपत्रे, दिवाळी अंक आणि संपादित ग्रंथांमधून त्यांचे 3 हजारांहून अधिक लेख प्रसिद्ध झाले. 'बहुरूपी भारूड' या संत एकनाथ महाराज यांच्या पारंपरिक भारूडांचे त्यांनी अडीच हजारांहून अधिक कार्यक्रम महाराष्ट्रासह अमेरिका, दुबई येथे सादर केले.

राज्यातील विविध व्याख्यानमालांमधून त्यांनी हजारो अभ्यासपूर्ण आणि रसाळ व्याख्याने दिली आहेत. अमेरिकेतील विश्व मराठी साहित्य संमेलनामध्ये ते एका परिसंवादाचे अध्यक्ष होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 24 व्या विभागीय साहित्य संमेलन, महाराष्ट्र साहित्य सभेच्या इंदूर येथील शंभराव्या संमेलनाचे, बडोदा येथील मराठी वाङ्मय मंडळाच्या 68 व्या साहित्य संमेलनाचे, कडोली-बेळगाव येथील 21 व्या मराठी साहित्य संमेलनाचे, 12 व्या बंधुता साहित्य संमेलनाचे आणि विटा येथील 29 व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. त्याशिवाय राळेगणसिद्धी येथे झालेल्या पहिल्या ग्रामजागर साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

लेखन, संशोधन, प्रबोधन आणि कलाविष्कारासाठी त्यांना महाराष्ट्र शासनासह विविध संस्थांनी पुरस्कार देऊन गौरविले होते. त्यामध्ये स्वामी विवेकानंद पुरस्कार, आचार्य अत्रे प्रतिष्ठानचा कलाकार पुरस्कार, रांजणगाव गणपती संस्थानचा महागणपती पुरस्कार, गदिमा साहित्यभूषण पुरस्कार, भारुडाचार्य पुरस्कार, सत्यशोधक समाजभूषण पुरस्कार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार अशा महत्त्वाच्या पुरस्कारांचा समावेश आहे. सध्या ते भारतीय संगीत प्रसारक मंडळाचे गांधर्व महाविद्यालयाचे अध्यक्ष होते. तसेच, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news