

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]
नसरापूर : पुढारी वृत्तसेवा : भोर तालुक्यातील दिवळे येथील एका रिक्षाचालकाने 1 लाख 80 हजार किमतीचे 3 तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग संबंधित महिलेस परत करून प्रामाणिकपणा दाखविला. महिलेच्या पतीने 5 हजार रुपयांचे बक्षीस देऊन या रिक्षाचालकाचा सत्कार केला. गुरुवारी (दि. 13) रोजी कापूरव्होळ चौकात ही घटना घडली. सुनील रघुनाथ बाठे असे रिक्षाचालकाचे नाव आहे. नसरापूर (ता. भोर) येथील प्रमिला सचिन शेटे ह्या गुरुवारी सकाळी त्यांच्या मुलीसह दिवे येथे यात्रेसाठी जात होत्या. चेलाडी फाटा येथून त्या प्रवासी रिक्षा (एमएच 12 आरटी 7485) मधून प्रवास करीत कापूरव्होळ येथे पोहचल्या.
तेथून पुढे त्या दुसर्या वाहनाने सासवडपर्यंत पोहचल्या. मात्र, दोनपैकी एक बॅग रिक्षामध्येच विसरल्याचे शेटे यांच्या लक्षात आले. त्यांनी सासवडमधून पुन्हा परत येऊन पतीच्या मदतीने रिक्षाचालकाचा परिसरात शोध घेतला. मात्र, तो आढळला नाही. शेटे दाम्पत्याने याबाबत राजगड पोलिसांना माहिती दिली. शुक्रवारी (दि. 14) बाठे यांना रिक्षामध्ये बॅग निदर्शनात आली. बाठे यांनी लागलीच शेटे यांची बॅग पोलिस ठाण्यात दिली. बॅग मिळताच शेटे दाम्पत्याने बाठे यांचे आभार मानत त्यांना 5 हजार रुपयांचे बक्षीस दिले. पोलिस उपनिरीक्षक संजय सुतनासे, सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय ढावरे, ठाणे अंमलदार मयूर निंबाळकर, गणेश कुदळे, सचिन नरुटे, सचिन शेटे या वेळी उपस्थित होते.