

तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा : शिक्रापूर येथील चाकण रोड परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये शनिवारी (दि. 3) पत्त्यांच्या साहाय्याने जुगार खेळणार्या लोकांवर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत 33 लाखांचा ऐवज जप्त करत जुगार खेळणार्या सहा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. शिक्रापूर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, शिक्रापूर (ता. शिरूर) येथील चाकण रोड परिसरात असलेल्या सनी बार रेस्टॉरंटमध्ये काही जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांना मिळाली. त्यांनतर पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे, हवालदार लहानू बांगर, पोलिस नाईक विकास पाटील, रोहिदास पारखे, प्रतीक जगताप यांनी तेथे जाऊन पाहणी केली असता काही जण जुगार खेळत असल्याचे दिसले. पोलिसांनी त्यांना जागेवर पकडत त्यांच्या जवळील पैसे, पत्ते, मोबाईल तसेच वाहने असा तब्बल 33 लाख 32 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.
शिक्रापूर पोलिस ठाण्यात याबाबत शिक्रापूरचे पोलिस कर्मचारी प्रतिक भाऊसाहेब जगताप (रा. शिक्रापूर, ता. शिरुर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तिरुपती चलसानी, अशोक संपत कदम, कैलास सुदाम खेडकर (तिघे रा. शिक्रापूर, ता. शिरूर), राहुल नारायण कोळपे (रा. उरळगाव, ता. शिरूर), पांडुरंग हरिभाऊ ढोकले (रा. करंदी, ता. शिरूर) आणि सचिन बापू कायगुडे (रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर) या सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे व पोलिस कर्मचारी प्रतीक जगताप याबाबतचा तपास करीत आहेत.