

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्पालगतच्या जागेचा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) लिलाव करण्यात आला आहे. त्यामुळे या जागेवर विकसकामार्फत काम सुरु करण्यात आले आहे. या जागेत शिवसृष्टी उभारावी, अशी भूमिका विविध संघटनांनी घेतली आहे. तसेच, येथील भूखंडाच्या झालेल्या व्यवहाराला विरोध करण्यासाठी सोमवारी (दि. 10) आकुर्डीतील पीएमआरडीए कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
भक्ती-शक्ती शिवजयंती उत्सव समितीचे मारुती भापकर यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती महोत्सव संबंधित जागेत मोठ्या प्रमाणात साजरा केला जात होता. मात्र, पीएमआरडीएने या जागेचा लिलाव केला आहे. त्याचा विरोध करण्यासाठी सोमवारी सकाळी 10ः30 ते दुपारी 2 या वेळेत काळी रिबीन बांधून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामध्ये विविध राजकीय पक्ष व संघटना सहभागी होणार आहेत. पीएमआरडीए व बांधकाम व्यावसायिकांमध्ये या जागेबाबत झालेले सर्व व्यवहार रद्द करावे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर शिवसृष्टी उभारण्यात यावी. महापालिकेच्या वतीने होणारी शिवजयंती, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव, निगडी ग्रामस्थांचा गाव जत्रेचा कार्यक्रम देखील याच जागेत घेण्यात यावा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.