.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे : पुढारी वृत्तसेवा
आयएएस पद गमावून बसलेल्या अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्या विरोधात पुणे पोलिसांत कामात अडथळा आणल्याप्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. त्यांच्यावर अदखपात्र गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या तक्रारीमुळे खेडकर कुटुंबीय हे पुन्हा अडचणीत येणार असल्याचे दिसत आहे.
पोलिसांनी अर्जाची चौकशी सुरू केली आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील एका तहसीलदाराने दोन पानी तक्रार अर्ज दिला आहे. पुणे पोलिसांकडून या अर्जाची चौकशी सुरू करण्यात आली असून, त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
आयएएस प्रशिक्षणार्थी म्हणून पूजा खेडकर यांची पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात बदली झाली होती दरम्यान यानंतर मात्र त्या स्वतंत्र कॅबिन, शिपाई तसेच खासगी गाडीवर अंबर दिवा यामुळे वादग्रस्त ठरल्या. त्यांनी व त्यांच्या वडिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन पुजा यांना सुविधा द्यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर दबाव आणला होता. याबाबत जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी शासनाला एक अहवाल सादर केला होता.
तत्पूर्वी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना स्वतंत्र दालन, शिपाई किंवा इतर गोष्टी नसतात. मात्र पूजा खेडकरने यासाठी आग्रह धरला होता. यावादातूनच त्यांची वडिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर दबाव आणला होता. यामुळे त्या वादात अडकल्या. त्यात आता त्यांचे आयएएस पददेखील रद्द झाले आहे.
दरम्यान, आता याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वसाधारण विभागाचे तहसीलदार यांनी कामात अडथळा आणला असल्याबाबत तक्रार अर्ज बंडगार्डन पोलिसांकडे दिला आहे. त्या अर्जाची चौकशी सुरू केली असून, तहसीलदारांचा जबाब नोंदविणे बाकी आहे.