

दिवे; पुढारी वृत्तसेवा: पुणे-पंढरपूर महामार्गावर मुख्य असलेला दिवे घाट सध्या समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. घाटात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनचालकांना कसरत करीत घाट पार करावा लागत आहे. दुचाकी गाड्यांना रात्रीच्या वेळी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
घाटात ठिकठिकाणी रात्री अज्ञात वाहनांतून मृत कोंबड्या व इतर राडारोडा टाकला जात आहे. त्याची दुर्गंधी घाटात पसरत आहे. या वर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने छोट्या छोट्या दरडी रस्त्यावर पडत आहेत. दरडींचा राडारोडाही गटारात काही रस्त्यावर तसाच पडलेला आहे. परिणामी, अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
दिवे घाट पुणे शहरापासून जवळच आहे. घाटात पर्यटकांची संख्या वाढत आहे. घाटात ठिकठिकाणी सेल्फी पॉइंट तयार झाले असून, हे सेल्फीबहाद्दर आपली वाहने रस्त्यावर उभी करून पर्यटनाचा आनंद लुटतात. अशा बेशिस्त पर्यटकांना आवर घालण्याची मागणी होत आहे.