पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची संख्या ही 32 पेक्षा अधिक असल्याचे अर्ज माघारी नंतर स्पष्ट झाले. याचा परिणाम मतदान यंत्रांच्या संख्या वाढण्यावर झाला असून, आता बारामतीनंतर इतर तीनही मतदारसंघांसाठी तीनपेक्षा अधिक मतदान यंत्रे लागणार आहेत. तर जवळपास पाच हजारांहून अधिक अतिरिक्त मतदान यंत्रांची प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. चारही मतदारसंघात प्रत्येक ठिकाणी तीन मतदान यंत्रे वापरण्यात येणार आहेत. उपलब्ध मशिनचे वितरण करून अतिरिक्त पाच हजार मशिनची आवश्यकता भासणार आहे.
तेवढ्या मशिन प्रशासनाकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. बारामतीसाठी यापूर्वीच 38 उमेदवार रिंगणात आहेत, तर पुणे 35, शिरूर 32 आणि मावळसाठी 33 उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. बारामतीसाठी तीन मतदान यंत्रे लागणार हे यापूर्वीच स्पष्ट झाले होते, त्यानंतर इतर तीन मतदारसंघासाठी किती मतदान यंत्रे लागणार याची उत्सुकता होती.
शिरूर लोकसभा मतदारसंघात 32 उमेदवार निश्चित झाले आहेत. 32 उमेदवारांसाठी पहिल्या दोन यंत्रात प्रत्येकी 16 उमेदवारांचा समावेश असेल. केवळ नोटाच्या मतासाठी अतिरिक्त आणखी एक मतदान यंत्र वापरण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे. आणखी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला असता तर कदाचित अतिरिक्त मतदान यंत्राची आवश्यकता लागली नसती, असे निरीक्षण एका अधिकार्याने नोंदविले.
पुण्यात 2 हजार 18 मतदान केंद्रे असून आतापर्यंत 2 हजार 870 इतक्या मतदान यंत्रांचे वाटप केले आहे. एकूण सात हजार 264 इतक्या मतदान यंत्रांची गरज असून पुण्यासाठी आणखी चार हजार 820 इतकी यंत्रे लागणार आहेत. शिरूरमध्ये 2 हजार 509 मतदान केंद्रे आहेत. आतापर्यंत 3 हजार 559 इतकी मतदान यंत्रे वाटली आहेत. अतिरिक्त पाच हजार 474 इतक्या मशिनची गरज आहे. मावळमध्ये 1 हजार 339 इतके मतदान केंद्रासाठी 1 हजार 900 मशिनचे वाटप यापूर्वी केले आहे.
हेही वाचा