पुणे : मांजर पाळण्यासाठी परवाना लागणार; महापालिकेच्या आरोग्य विभागाचा निर्णय

पुणे : मांजर पाळण्यासाठी परवाना लागणार; महापालिकेच्या आरोग्य विभागाचा निर्णय
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : घरात मांजर पाळायचे असेल तर आता त्यासाठी महापालिकेचा परवाना घ्यावा लागणार आहे. आरोग्य विभागाच्या या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली असून, पुढील आठ दिवसांत परवान्यासाठी ऑन- लाइन प्रक्रिया राबविली जाणार आहे. महापालिका कायद्यातील तरतुदीनुसार मांजर, कुत्रा, घोडे अशा पाळीव प्राण्यांना घरी ठेवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी करून त्यासाठी रितसर परवानगी घेणे बंधनकारक आहे.

मात्र, आत्तापर्यंत केवळ कुत्रा आणि घोडे पाळण्यासाठीच परवानगी दिली जात होती. आता मात्र मांजर पाळण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. प्रामुख्याने अनेकदा शेजारच्या घरात मांजर पाळल्याचा त्रास झाल्याच्या तक्रारी पालिकेकडे येत असतात. काही ठिकाणी एका घरात दहा ते पधरा मांजरे पाळली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. पाळलेल्या मांजरीवरून झालेले वाद पोलिस स्टेशनपर्यंत जाण्याचे प्रकार घडले आहेत.

त्यामुळे कुर्त्यांप्रमाणे पाळीव मांजराची महापालिकेकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मांजराची नोंदणी करण्यासाठी 50 रुपये इतके वार्षिक शुल्क भरावे लागणार असून रहिवासी पुरावा, लसीकरण प्रमाणपत्र आणि मांजराचा फोटो ही कागदपत्रे बंधनकारक असणार आहेत. तसेच एकदा परवाना घेतल्यानंतर दरवर्षी त्या परवान्याचे नूतनीकरण करून 50 रुपये परवाना शुल्कशिवाय अतिरिक्त 25 रुपये शुल्क घेतले जाणार आहे.

पाळीव कुत्री 1 लाख; पण परवानाधारक साडेपाच हजार
शहरात पाळीव कुत्र्यांची संख्या जवळपास लाखभराच्या घरात आहे, मात्र 5 हजार 500 कुत्र्यांची नोंदणी महापालिकेकडे आहे. पाळीव प्राण्यांसाठी परवाना घेण्याची मानसिकता नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.

कुत्रा पाळण्यासाठी ऑनलाइन परवाना दिला जातो, त्याप्रमाणे मांजर पाळण्यासाठी परवान्याची प्रक्रियाही ऑनलाइन करण्यात येणार आहे. पुढील आठ दिवसांत ही सुविधा उपलब्ध होईल.
                                                     डॉ. सारिका फुंडे, आरोग्य विभाग

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news