चाकण : पुढारी वृत्तसेवा : चाकणजवळील कडाचीवाडी (ता. खेड) येथे सोमवारी (दि. 22 ) सकाळी उसाच्या शेतात बिबट्या दिसून आला. मागील आठ ते दहा दिवसांपासून याच भागात बिबट्या आढळून आल्याचे स्थानिकांनी वन विभागाला कळविले होते. वन विभागाने तातडीने या भागात पिंजरा लावला आहे. कडाचीवाडी येथील उसाच्या शेतात हा बिबट्या दहा दिवसांपूर्वी दिसून येत होता. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास हा बिबट्या एका उसाच्या शेतातून दुसर्या शेतात जात असताना दिसून आला. भर दिवसा या भागात बिबट्या दिसल्यानंतर तातडीने याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली. चाकण वन विभागाच्या अधिकार्यांनी पोलिस व रेस्क्यू टीमच्या सदस्यांसह घटनास्थळी पाहणी केली. तातडीने या भागात पिंजरा लावण्यात आला आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांतील चाकण एमआयडीसी आणि शहर व लगतच्या ग्रामीण भागात बिबट्या सातत्याने दिसून येत आहे. चाकण आणि पूर्व भागातील शेलपिंपळगाव व लगतच्या सर्व गावांच्या परिसरातील नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.
लहान मुलांची काळजी घ्या
कडाचीवाडी येथील उसाच्या शेतात 10 दिवसांपासून बिबट्या आढळून येत होता. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास उसाच्या शेतात यंत्राच्या साह्याने ऊसतोडणी सुरू असताना यंत्राच्या आवाजाने बिबट्याने ती जागा सोडली आहे. परिसराची पाहणी केली असून, पाळीव गुरे आणि लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.