

पारगाव; पुढारी वृत्तसेवा : वळती (ता. आंबेगाव) येथे भोर- वाळुंज मळ्यात गेणभाऊ विठ्ठल वाळुंज यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून तिला जागीच ठार केले. ही घटना गुरुवारी (दि. 24) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यामुळे भोर- वाळुंज मळ्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे. भोर- वाळुंज मळ्यात गेणभाऊ वाळुंज यांच्या घराशेजारी जनावरांचा गोठा आहे.
गोठ्यामध्ये पाच शेळ्या व एक गाय नेहमीप्रमाणे बांधली होती. संपूर्ण गोठ्याला सात फुटी तारेचे कुंपण व तारेच्या वर दोन ते तीन फूट पत्र्यापर्यंत शेडनेट जाळी लावलेली आहे. गुरुवारी (दि. 24) रात्री आठ ते नऊ वाजेच्या सुमारास वाळुंज यांच्या गोठ्याजवळ बिबट्या आल्याचे गेणभाऊ वाळुंज व त्यांचा मुलगा भाऊ वाळुंज यांनी पाहिले. त्यावेळी त्यांनी आरडाओरडा करून बिबट्याला तेथून पळवून लावले. त्यानंतर नेहमीप्रमाणे गोठ्यात जनावरे बांधली.
दरम्यान शुक्रवारी (दि. 25) सकाळी गेणभाऊ वाळुंज जनावरे बाहेर काढण्यासाठी गेले असता त्यांना एक शेळी ठार झाल्याचे दिसले. मध्यरात्रीच्या सुमारास शेडच्या तारेच्या कुंपणावरील जाळी तोडून बिबट्याने आत प्रवेश करून शेळीला ठार केले. या घटनेची माहिती गेणभाऊ वाळुंज यांनी वनविभागाला दिली आहे. भोर- वाळुंज मळ्यात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. येथील दत्तात्रय भोर यांच्या गोठ्यातदेखील दररोज बिबट्या येत होता. शेतकर्यांना बिबट्याचे अनेकदा दर्शन झाले आहे.