

पुणे : पुढारी वृत्तसेवा : येरवड्यातील नेहरू उद्योग केंद्र संचलित बालसुधारगृहातून पळालेल्या एका अल्पवयीनाला पकडण्यास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला यश आले आहे. परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना पुणे स्टेशन परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. विविध गुन्ह्यांत सात अल्पवयीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना येरवड्यातील सुधारगृहात ठेवण्यात आले. मात्र, येथील भिंतीला शिडी लावून हे अल्पवयीन पसार झाल्याची घटना जानेवारीत घडली होती.
या मुलांचा पोलिस शोध घेत असून, यातील काहीजणांना यापूर्वी ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, हा मुलगा परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असून, तो पुणे स्टेशन येथे असल्याची माहिती युनिट एकचे अंमलदार नीलेश साबळे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. युनिट एकचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले, सहायक निरीक्षक अशिष कवठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी नीलेश साबळे, शशिकांत नरूटे, शुभम देसाई, विठ्ठल साळुंखे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.