

पुणे; पुढारी वृत्तसेवा: अडीच किलो वजनाच्या बालकास जन्मजात हृदयविकार असल्याचे निष्पन्न झाल्यावर त्या नवजात अर्भकावर पीडीए स्टेन्टिंग ही दुर्मीळ हायब्रीड शस्त्रक्रिया पुण्यातील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेस (एआयसीटीएस) संस्थेतील हृदयविकारतज्ज्ञ, छातीविकार तज्ज्ञ आणि हृदयशस्त्रक्रिया भूलतज्ज्ञांच्या पथकाने केली. त्यांच्या या प्रयत्नाच्या पराकाष्ठेमुळे अर्भकाला नवजीवन मिळाले असून, प्रकृतीत सुधारणा होताना दिसत आहे.
फुप्फुसाच्या झडपा बंद असलेले, 'पल्मनरी अट्रेसिया' या विकार जडलेले एक नवजात अर्भक नुकतेच जन्माला आले. या विकारात जन्मानंतर लगेचच फुप्फुसाच्या धमन्यांकडे होणार्या रक्तप्रवाहाला पेटंट डक्ट्स आर्टेरिओससमुळे अवरोध निर्माण होतो. नवजात अर्भकांच्या रक्तवाहिन्या अतिशय लहान असल्याने स्टेन्ट टाकणे हे आव्हान ठरते.
मात्र, या बालकाच्या फुप्फुसाला रक्तपुरवठा करणार्या धमणीचा रक्तप्रवाह व्यवस्थित सुरू राहावा, यासाठी हृदयविकारतज्ज्ञ, शल्यविशारदांनी धमन्यांना छेद दिला आणि स्टेंट टाकण्याची प्रक्रिया सुकर झाली. या स्टेन्टिंगच्या शस्त्रक्रियेमुळे या नवजात अर्भकाला नवजीवन मिळाले. एआयसीटीएस हे लष्कराचे सुपर स्पेशालिटी अग्रणी केंद्र असून, जन्मजात गुंतागुंतीच्या हृदयविकार शस्त्रक्रियांचे यशस्वी व्यवस्थापन करण्यात कायम आघाडीवर राहिले आहे.