पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'हरे राम हरे कृष्णा…जय जगन्नाथ, जय बलराम, जय सुभद्रा…'चा अखंड जयघोष, वरुणराजाची संततधार आणि भाविकांचा मोठा उत्साह अशा भक्तिमय वातावरणात पुण्यामध्ये जगन्नाथ रथयात्रा सोहळा जल्लोषात साजरा झाला. ओडिशामधील जगन्नाथ पुरी येथील रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ – इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे आयोजित रथयात्रेत हजारो भाविक पारंपरिक वेशात सहभागी झाले होते.
टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालय येथून जगन्नाथ रथयात्रा सोहळ्याला प्रारंभ झाला. या वेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार रवींद्र धंगेकर, राजेश पांडे, इस्कॉनचे वरिष्ठ संन्यासी लोकनाथ स्वामी महाराज, प्रबोधानंद सरस्वती स्वामी महाराज, श्रीकृष्ण चैतन्य स्वामी महाराज, रथयात्रेचे मार्गदर्शक व इस्कॉन मंदिराचे उपाध्यक्ष रेवतीपती दास, रथयात्रा समन्वयक अनंत गोप दास, मंदिराचे उपाध्यक्ष श्वेतदीप दास उर्फ संजय भोसले, जनार्दन चितोडे आदींच्या हस्ते पूजन झाले. 5 ते 6 हजार पुणेकरांनी सहभाग घेतला. जगन्नाथ पुरी येथे प्रत्येकजण वैयक्तिकरीत्या जाऊ शकत नाही. त्यामुळे इस्कॉनतर्फे जगन्नाथाची रथयात्रा पुरीबाहेरही सुरू केली.