

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी अनियंत्रित होत राहते. भारतातील तरुणांनी मधुमेहींसाठी रक्तातील ग्लुकोजची पातळी मोजू शकणारे अॅप्लिकेशन तयार केले आहे. सेन्सरसह असलेल्या अॅप्लिकेशनमुळे सुई न टोचता, रक्त न काढता ग्लुकोजची सध्याची आणि पुढील 24 तासांमधील पातळी मोबाईलमध्ये पाहता येणार आहे. शीलराज कोल्हे, आदिनाथ घाडगे आणि रोहित जोंधळे या तरुणांनी संशोधनाद्वारे बि—टनमधील आरोग्य क्षेत्रात मैलाचा दगड निर्माण केला आहे. तातडीच्या वेळी नातेवाइकांना अॅप्लिकेशनच्या माध्यमातून मेसेज अलर्ट पाठविला जाणार आहे. सुरुवातीला बि—टन आणि त्यानंतर भारतात अॅप्लिकेशन कार्यान्वित केले जाणार आहे.
तरुणांनी हे संशोधन 'मॅग्निट्यूड एआय' या स्टार्टअपद्वारे केले असून, बि—टनसोबतच जगभरात अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. संशोधनाची दखल घेऊन स्कॉटलंड मधील एबी व्हेंचर्स, अपॉर्च्युनिटी नॉर्थ-ईस्ट आणि रॉबर्ट गॉर्डन युनिव्हर्सिटी यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. शीलराज कोल्हे यांना अॅबर्डीन युनिव्हर्सिटीतर्फे गौरविण्यात आले आहे. मधुमेहींना बहुतांश वेळा डॉक्टरांकडे तपासणीसाठी जाऊन रक्तातील ग्लुकोजची पातळी तपासावी लागते. घरच्या घरी ग्लुकोमीटरच्या साह्याने पातळी तपासताना सुईने रक्त काढावे लागते. यावर उपाय म्हणून आम्ही सेन्सरयुक्त अॅप्लिकेशन तयार केले आहे. या माध्यमातून रुग्णांना 24 तास ग्लुकोजची पातळी लाइव्ह पाहता येणार आहे. त्याचप्रमाणे पुढील 24 तासांतील पातळीही आधीच समजू शकणार आहे, असे शीलराज कोल्हे यांनी सांगितले.