

पुणे : पुढारी वृत्तसेवा चारचाकी गाड्यांच्या सायलेन्सरची चोरी करणार्या टोळीला गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून 16 गुन्ह्यांचा छडा लावत 3 लाख 20 हजार रुपये किमतीचे 16 सायलेन्सर जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या दोघांमध्ये गाड्या दुरुस्ती करणार्या दोघा मेकॅनिकचा सहभाग आहे. आरिफ सलीम शेख (वय 19), हुसेन बढेसाहब शेख (वय 23), साहील वसीम शेख (वय 19), शहजाद अक्रम खान (वय 19) रहीम खलील शेख (वय 24, राहणार सर्व वैदवाडी, रामटेकडी, हडपसर), सोहेल सलीम खान (वय 23, महंमदवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाचे कर्मचारी हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना सायलेन्सर चोरी करणारी एक व्यक्ती हडपसर येथील म्हाडा सोसायटीत थांबल्याचे समजले. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक निरीक्षक कृष्णा बाबर, उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, चैत्राली गपाट, कर्मचारी रमेश साबळे, आश्रुबा मोराळे, राजस शेख, अकबर शेख, प्रताप गायकवाड यांच्या पथकाने सापळा रचून संशयित आरोपींना ताब्यात घेतले.
दिवसा रेकी अन् रात्री चोरी
प्रामुख्याने चोरटे मारुती ईको आणि सुपर कॅरी या चारचाकी गाड्यांतील सायलेन्सरची चोरी करत होते. या गाड्यांच्या सायलेन्सरची किंमत सत्तर ते ऐंशी हजार रुपये आहे. सायलेन्सरच्या कनव्हर्टरमध्ये हा प्लॅटिनम धातू असतो. दिवसा चोरटे गाड्यांची रेकी करून ठेवत असत, रात्रीच्यावेळी जाऊन गाडीचा सायलेन्सर काढून पोबारा करत. त्यानंतर तो तोडून त्यातील माती गाळून प्लॅटिनमची गोळी बाहेर काढत असत, आरोपींनी चोरी केलेल्या सायलेन्सरमधील प्लॅटिनम धातू बाहेरच्या राज्यातील आरोपींना विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कामगिरी केली.
सायलेन्सर चोरल्यानंतर त्यातील कन्व्हर्टरमध्ये असलेली मौल्यवान प्लॅटिनम धातुमिश्रित माती काढून ती परराज्यातील आरोपींना विकल्याचे निष्पन्न झाले आहे. टोळीकडून 16 गुन्ह्यांचा छडा लागला आहे. फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
-हेमंत पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा