

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर हरवलेला चार वर्षांचा चिमुरडा साथी रेल्वे चाईल्ड लाईनला सापडला होता. मात्र, त्याला घेऊन जाण्यासाठी त्याच्या कुटुंबातील कोणीही अद्यापपर्यंत आलेले नाही. त्यामुळे हा मुलगा गेली सहा महिन्यांपासून आपल्या कुटुंबीयांची वाट पाहत आहे. पुणे रेल्वे स्थानकावर दिवसाआड हरवलेली लहान मुले सापडतात. त्यांना रेल्वे प्रशासन, रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलिस, साथी चाईल्ड लाईन यांच्या मदतीने सुखरूप त्यांच्या कुटुंबीयांकडे पोहचविले जाते. मात्र, गेली सहा महिने झाला तरी अद्यापर्यंत या चिमुरड्याला घेऊन जाण्यासाठी कोणीही आलेले नाही. त्यामुळे हा चिमुरडा हिरमुसला असून, कुटुंबीयांची वाट पाहत आहे.
रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर हा चिमुरडा गेली सहा महिन्यांपूर्वी रेल्वे सुरक्षा दलाला सापडला होता. त्यांनी
त्याला आमच्याकडे सुपूर्द केले होते. त्याचे समुपदेशन करून आम्ही त्याच्या कुटुंबीयांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. पण मुलगा खूप छोटा आहे. त्यामुळे आम्ही त्याला जवळच्या संस्थेत ठेवले आहे, असे साथी रेल्वे चाईल्ड लाईनच्या वतीने सांगण्यात आले.
…अशी आहे मुलाची माहिती
लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहा महिन्यांपूर्वी हा चिमुरडा आम्हाला पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर सापडला. तो त्याचे नाव नकुल चव्हाण (वय 4 वर्षे, रा. चाकण) असे सांगत आहे. रंगाने निमगोरा, नाक सरळ, डोळे काळे मोठे, केस काळे बारीक, अंगाने सडपातळ, कपडे अंगात लाला पांढर्या रंगाचा टी-शर्ट त्यावर डिझाईन असलेले व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, पायात लाल रंगाची चप्पल अशा वर्णनाचा मुलगा दि.19 सप्टेंबर 2022 रोजी पुणे रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 6 वर मिळून आला. त्याला बाल कल्याण समिती, पुणे येथे हजर केले असता, सीडब्ल्यूसी यांनी मुलाच्या आई-वडिलांचा शोध लागेपर्यंत संस्थेत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.