

पुणे; पुढारी वृत्तसेवा : रस्ते आणि पदपथांवर थुंकणार्यांविरोधात महापालिका प्रशासनाने कडक कारवाई सुरू केली आहे. 10 जानेवारीपासून 353 जणांवर कारवाई केली आहे. या कारवाईत 3 लाख 53 हजार रुपये वसूल करण्यात आला आहे. जी 20 परिषदेच्या बैठकांसाठी शहरातील परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी प्रशासनाकडून विविध कामे केली. शहर आकर्षक दिसावे, यासाठी रस्ते दुभाजक, पदपथांसोबतच सार्वजनिक भिंतींची रंगरंगोटी करण्यात आली.
मात्र, या कामांवर तंबाखू, गुटखा खाणारे पिचका-या मारुन पुन्हा ते विद्रुप करत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने पिचकारी बहाद्दरांवर वचक बसविण्यासाठी 10 पासून कारवाई हाती घेतली आहे. या कारवाईत आठ दिवसात 353 जणांवर कारवाई केली आहे. या कारवाईत 3 लाख 53 हजार रुपये दंड वसूल केला आहे. महापालिकेच्या नवीन विस्तारीत इमारतीच्या पार्कींगमध्ये चारही कोपर्यात भंगार साहित्य आणि जुने फर्निचर अनेक महिन्यापासून पडून असून जागोजागी आणि कोपर्या कोपर्यांत तंबाखू, पान आणि गुटख्याच्या पिचकार्या मारलेल्या आहेत. त्यामुळे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणार्या प्रशासनाचे आपल्या घरातच लक्ष नसल्याचे चित्र पहायला मिळते.
भारत सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून शहरात स्वच्छता मोहीम राबविली जाते. तसेच सार्वाजनिक ठिकाणी घाण टाकणार्यांवर, थुंकणार्यांवर कारवाई केली जाते. तसेच वाहतुकीला अडथला ठरणारी धुळ खात उभी असणारी वाहने व इतर साहित्य अतिक्रमण विभागाकडून कारवाई करून काढले जाते.
ही कारवाई शहरभर करणार्या महापालिका अधिकार्यांचे आपल्या घरातच दुर्लक्ष होत आहे. महापालिकेच्या विस्तारीत इमारतीच्या तळमजल्यातील पार्कींगमध्ये जागोजागी भंगार साहित्य आणि जुने फर्निचर अनेक महिन्यांपासून पडून आहे. त्यातच कामचुकार कर्मचारी तासनतास त्या फर्निचरवर बसून जवळच पान, तंबाखू आणि गुटखा खावून पिचकार्या मारतात. एवढेच नाही तर लिफ्टच्या बाहेर कोपर्यातही मोठ्या प्रमाणात पिचकार्या मारलेल्या आहे.