रेल्वे स्थानकावर गर्दीचा महापूर; उन्हाळी सुट्यांचा परिणाम अजूनही ‘जैसे थे’

रेल्वे स्थानकावर गर्दीचा महापूर; उन्हाळी सुट्यांचा परिणाम अजूनही ‘जैसे थे’

पुणे : पुढारी वृत्तसेवा : उन्हाळी सुट्यांचा असलेला मे महिना आता निम्मा संपला आहे. मात्र, तरी सुद्धा पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे प्रवाशांची गर्दी कायम असल्याचे चित्र गुरुवारी (दि.16) पाहायला मिळाली. यंदा उन्हाळी सुट्यांमध्ये बाहेरगावी जाणार्‍या प्रवाशांच्या संख्येत पाच पटीने वाढ झाल्याचे समोर आले आहे. या गर्दीला नियंत्रित ठेवण्यासाठी रेल्वे अधिकार्‍यांना यंदा मोठे कष्ट घ्यावे लागले.
पुणे विभागाचे वरिष्ठ अधिकारी स्वत: रेल्वे स्थानकावर उतरले होते. प्रवाशांची गर्दी लक्षात घेत, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रेल्वेने पाचपट अधिक विशेष गाड्या सोडल्या.

त्यानंतर प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला, परंतु रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची गर्दी अजूनही 'जैसे थे'च असल्याचे चित्र गुरुवारी दिसले. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बाहेरगावी जाणार्‍या प्रवाशांची गर्दी पुणे रेल्वे स्थानकावर वाढते. तर मे महिन्याच्या अखेरीस बाहेरगावी गेलेले प्रवासी परतत असल्यामुळे गर्दी वाढल्याचे चित्र दरवर्षी दिसते. मात्र, यंदा मे महिन्याच्या निम्म्यातच म्हणजेच 16 तारखेला (गुरुवारी) पुणे रेल्वे स्थानकावर गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.

आरक्षण केंद्रांवर रांगा; प्लॅटफॉर्मसह परिसरात गर्दी

पुणे रेल्वे स्थानकावर गुरुवारी प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील आणि अंब्रेला गेटशेजारील इमारतीमध्ये असलेल्या आरक्षण केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र गुरुवारी पाहायला मिळाले. यासह स्थानकावरील अंब्रेला गेटसमोरील मोकळ्या जागेत आणि प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.

उन्हाळी सुट्या असल्यामुळे अनेक नागरिक बाहेरगावी जाण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावर गर्दी होत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आमच्याकडून विशेष गाड्यांचे नियोजन केले जात आहे. गर्दी असल्याने प्रवाशांनी आपल्या सामानाची काळजी घ्यावी, तसेच, मौल्यवान वस्तू सोबत घेऊन जाऊ नयेत.

– रामपाल बडपग्गा, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news