पुणे : पोषण आहारही होणार चटपटीत ! नव्या पाककृती सुचवण्यासाठी समिती स्थापन

पुणे : पोषण आहारही होणार चटपटीत ! नव्या पाककृती सुचवण्यासाठी समिती स्थापन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शाळांमध्ये दिल्या जाणार्‍या पोषण आहारामध्ये स्थानिक अन्नपदार्थ, तृणधान्ये व अन्य पदार्थांचा समावेश करून आहाराचा दर्जा आणि पौष्टिकता वाढवण्यासाठी, सध्याच्या पाककृतींमध्ये सुधारणा सुचवण्यासाठी तज्ज्ञ समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीमध्ये ज्येष्ठ शेफ विष्णू मनोहर यांच्यासह शिक्षण, हॉटेल, संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे.
शालेय शिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. प्रधामंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या आहाराच्या पाककृतीची निश्चिती 2011 मध्ये करण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत प्रसिद्ध झालेल्या अहवालातून विद्यार्थ्यांचा बॉडी मास इंडेक्स कमी-जास्त असणे, विद्यार्थ्यांच्या शरीरामध्ये लोहाचे प्रमाण कमी-जास्त असणे आदी बाबी निदर्शनास आल्या आहेत. तसेच केंद्र शासनाने उपलब्ध होणारे स्थानिक अन्नपदार्थ, तृणधान्य, अन्य पदार्थांचा समावेश करण्याच्या शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी आरोग्य, आहार, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये ज्येष्ठ शेफ विष्णू मनोहर, कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेश्वर, आघारकर संशोधन संस्थेतील प्रसाद कुलकर्णी, आहारतज्ज्ञ पूनम कदम, व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके, पोषणतज्ज्ञ डॉ. अर्चना ठोंबरे, महाराष्ट्र हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी संस्थेतील प्रतिनिधी, पोषणशक्ती निर्माण योजनेचे अधीक्षक वैभव बारेकर, राज्य समन्वय अधिकारी देविदास कुलाळ यांचा समावेश आहे.

बॉडी मास इंडेक्स सुधारणार !
विद्यार्थ्यांना दिला जाणारा आहार अधिक पौष्टिक, रुचकर आणि दर्जेदार होण्यासाठी वेगवेगळ्या पाककृती सुचवणे, पाककृतीतील धान्यादींचे प्रमाण निश्चित करून देणे, विद्यार्थ्यांच्या शरीरातील लोहाचे प्रमाण वाढणे आणि बॉडी मास इंडेक्स सुधारण्याच्या दृष्टीने आहाराच्या बदलाबाबत उपाययोजना सुचवणे यासाठी सर्व बाबींचा विचार करून धोरणात्मक उपाययोजना सुचवणे, अशी समितीची कार्यकक्षा निश्चित करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news