स्वच्छ मार्ग हीच ‘श्री’ची सेवा; गणेशोत्सवादरम्यान रस्तेसफाई करणार्‍या कर्मचार्‍यांच्या भावना

स्वच्छ मार्ग हीच ‘श्री’ची सेवा; गणेशोत्सवादरम्यान रस्तेसफाई करणार्‍या कर्मचार्‍यांच्या भावना
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: दर वर्षी लाडक्या बाप्पाचे आगमन होते. दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर मोठ्या दिमाखात विसर्जन सोहळा पार पडतो. गणरायाच्या आगमानपासून त्याच्या विसर्जनापर्यंत आमच्यावर स्वच्छतेची मोठी जबाबदारी असते. गणरायाची सेवा मानून आम्ही ती चोखपणे पार पाडतो, अशा भावना व्यक्त केल्या आहेत गणेशोत्सव व विसर्जन सोहळ्यानंतर रस्ते स्वच्छ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या सफाई कर्मचार्‍यांनी.

गेल्या कित्येक वर्षांपासून मी सफाई करण्याचे काम करते. याकाळात कामाचा व्याप जास्त असतो. पण, त्याचे काही वाटत नाही. आपण मंडळांचे कोणी नसलो, तरी सफाईतून आपणही या उत्सवात हातभार लावत असल्याची भावना निर्माण होते.

                                                       – अंजन्मा धनगर, सफाई कर्मचारी

विसर्जन मिरवणुका पार पडल्यानंतर खाद्यपदार्थांचे पॅकेट, डिशेश, पाण्याच्या बाटल्या यांसह चपलाही मोठ्या प्रमाणात जमा होतात. त्यांची विभागणी करून सर्व कचरा गोळा करून रस्ता साफ केला जातो. जेणेकरून नागरिकांना रस्त्यावर झालेल्या अस्वच्छतेचा त्रास होऊन ते मंडळांना नावे ठेवणार नाहीत. कारण मंडळांमुळे गणेशोत्सवाला शोभा आहे, त्यामुळे आम्ही लगोलग स्वच्छता करतो.
                                                                     – अशोक कांबळे, सफाई कर्मचारी

विसर्जनमार्गावर ग्रुपने सफाई करण्याची जबाबदारी दिली आहे. ती आम्ही पार पाडत आहोत. जशा मिरवणुका पुढे जातील त्याच्या शेवटच्या मंडळामागे आम्ही सफाई करण्यास सुरुवात करतो. गणरायाच्या निरोपात आम्हीही एक प्रकारे सहभागी होतो, याचा आनंद आहे.

                                                                       – दीपाली वैराट, सफाई कर्मचारी

सकाळी सातपासून विसर्जन मार्गाची साफसफाई करण्यास सुरुवात केली आहे. अन्य दिवशीही आम्ही ही कामे करतो. परंतु, गणेशोत्सवात हे काम करण्याचे एक वेगळे महत्त्व आहे. गणेशोत्सवादरम्यान केलेले काम हे गणरायाची सेवा केल्यासारखी वाटते. दर वर्षी गणरायाने यावे आणि दर वर्षी आमच्या हातून ही सेवा घडावी, हीच इच्छा आहे.

                                                                       – सुनीता राजेश, सफाई कर्मचारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news