बारामतीत बसने घेतला अचानक पेट

बारामतीत बसने घेतला अचानक पेट

बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामती-रावणगाव या मुक्कामी जाणार्‍या बसने बुधवारी (दि. 12) येथील रिंग रोडनजीक अचानक पेट घेतला. एका मोटारचालकाच्या प्रसंगावधानाने पुढील अनर्थ टळला. या बसमधून विद्यार्थ्यांसह अन्य 25 ते 30 प्रवासी प्रवास करीत होते.
बारामती आगारातून ही बस (एमएम 40 एम 9453) बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रावणगाव मुक्कामी जाण्यासाठी निघाली.

रिंग रोडने ही बस माळावरची देवी मंदिराकडून जात होती. या बसच्या पाठीमागून येथील आशीर्वाद ढाब्याचे पप्पू राऊत हे जात होते. या बसने खालील बाजूने पेट घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने त्यांची मोटार एसटीच्या पुढे नेत जोराने आवाज देत चालकाला बस थांबवण्यास सांगितले. बस थांबवल्यानंतर बसने खालील बाजूने पेट घेतला असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

त्यानंतर तत्काळ बसमधील विद्यार्थी व अन्य प्रवाशांना खाली उतरवून बसने घेतलेला पेट नियंत्रणात आणण्यात आला. ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही. अतितप्त वातावरणामुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, चालकाने आगाराला ही घटना कळवल्यानंतर बसमधून उतरविण्यात आलेल्या प्रवाशांसाठी वेगळ्या बसची व्यवस्था करण्याचे काम सुरू होते. तोपर्यंत रिंग रोडवर हे प्रवासी थांबून होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news